मुंबई: दहिहंडी उत्सवात मुलींना पळवून आणण्याचा सल्ला देणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांच्यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळची व्यक्ती अशी बेजबाबदार विधानं करते. अशा विधानांमुळेच लोकांची हिंमत वाढते, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राम कदम यांच्यावर टीका केली. भाजपा आमदार राम कदम यांचं विधान अतिशय बेजबाबदार आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. सत्ताधारी पक्षाचे आमदार मुलींना पळवून आणण्याची भाषा करत असतील, तर राज्यातील मुली कशा सुरक्षित राहणार?, असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. 'राम कदम यांच्या विधानामुळे लोकांची हिंमत वाढते. राम कदम यांच्या मतदारसंघातील एखादा मुलगा माझ्या मतदारसंघातील मुलीला पळवून नेईल, अशी भीती मला वाटते,' असंही आव्हाड म्हणाले. राम कदम यांच्या बेताल वक्तव्यानंतर मला वडील म्हणून काळजी वाटते, असं त्यांनी म्हटलं. काय म्हणाले होते राम कदम?भाजपा आमदार राम कदम यांनी काल घाटकोपरमध्ये दहिहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित तरुणांशी बोलताना राम कदम यांनी वादग्रस्त विधान केलं. 'एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्यानं त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावं. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. हे चुकीचं असेल तरी मी तुम्हाला 100 टक्के मदत करेन,' असं राम कदम दहिहंडी उत्सवात बोलताना म्हणाले.
मुलींना पळवण्याचा सल्ला देणाऱ्या राम कदमांची जितेंद्र आव्हाडांकडून 'शाळा'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 3:17 PM