मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या एक लाखावर पोहोचली आहे, असे माध्यमातून सांगण्यात येत असल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी एक लाखावर गेली असली तरी त्यातील ५० हजार रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, हे सांगितले जात नसून हा साधा चावटपणा नाही तर भलामोठा कट आहे, असा आरोप करत गुजरातचा मृत्युदर सांगा की, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना लगावला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यामातून अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले, "महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतचा १ लाखाचा आकडा आवर्जून सांगतात. पण त्यातील ५० हजार पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत हे सांगायचं आवर्जून टाळतात. हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे. गुजरातचा मृत्युदर सांगा की!"
दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ७ हजार ९५८ झाली आहे. एकीकडे, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना राज्याला मोठा दिलासा देणारे वृत्त आले असून, राज्यात कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा पन्नास हजारांवर पोहोचला आहे. राज्यात रविवारी १६३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९७८ झाली आहे. दरम्यान, काल कोरोनाच्या ३३९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात ५३ हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली.
राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ५७ हजार ७३९ नमुन्यांपैकी १ लाख ७ हजार ९५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ८७ हजार ५९६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५३५ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७७ हजार १८९ खाटा उपलब्ध असून सध्या २९ हजार ६४१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दिलासादायक! पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत ७ हजार ६१९ रुग्ण झाले कोरोनामुक्तपुणे जिल्ह्यात रविवार (दि.१४) रोजी एका दिवसांत तब्बल ३६५ नवीन रुग्णांची भर पडली. तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला.यामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ११ हजार ९२५ वर जाऊन पोहचली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले असून, आता पर्यंत ७ हजार ६१९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एकूण मृत्यू ४९८ एवढे झाले आहेत.
आणखी बातम्या....
मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओत छेडछाड, दिग्विजय सिंह यांच्यासह १२ जणांविरोधात एफआयआर दाखल
CoronaVirus News : अमित शहा 'अॅक्शन मोड'मध्ये, आज बोलविली सर्वपक्षीय बैठक
'आत्मनिर्भर पॅकेज' परिपूर्ण नाही; पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागारांकडूनच प्रश्नचिन्ह
पीएम केअर्स फंडाचे ऑडिट होणार, स्वतंत्र ऑडिटरची नियुक्ती
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद, निवृत्त महिला पोलीस निरीक्षकाकडून 1.10 कोटी रुपयांचा निधी