अमिताभजी, सध्या तुम्ही पेट्रोल भरत नाही की बिल पाहात नाही?; आव्हाडांचा खोचक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 11:51 AM2020-06-26T11:51:24+5:302020-06-26T11:52:58+5:30
पेट्रोल दरवाढीवरून जितेंद्र आव्हाड यांचा बॉलिवूडच्या अभिनेत्यांवर निशाणा
मुंबई: मोदी सरकारला सातत्यानं लक्ष्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आता बॉलिवूडच्या दिशेनं मोर्चा वळवला आहे. इंधन दरवाढीवरून सरकारला लक्ष्य करणाऱ्या आव्हाडांनी बिग बी अमिताभ बच्चन यांना उपरोधिक शैलीत टोले लगावले आहेत. अमिताभ यांच्या ८ वर्षांपूर्वीच्या ट्विटवरून आव्हाड यांनी कोपरखळी मारली आहे.
आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे. २०११ साली मनमोहन सिंग यांचं सरकार असताना इंधन दरवाढीवर अमिताभ बच्चन यांनी मिश्कील भाष्य करणारं एक ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी ग्राहक आणि पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्याचा संवाद लिहिला होता. 'पेट्रोल पंपवरील कर्मचारी- किती रुपयाचं भरू? मुंबईकर- कारवर २-४ रुपयांचं स्प्रे कर. जाळायची आहे,' असं ट्विट बच्चन यांनी केलं होतं.
Have u not refilled Ur fuel on petrol pump or u dnt look at the bill @SrBachchan
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 26, 2020
It's time for u to speak hope u r not biased
The price of diesel petrol has reached peak ab Mumbaikar kya kare car jalaye ya car chalaye https://t.co/ECYwNmmqYq
अमिताभ बच्चन यांनी २४ मे २०१२ मध्ये केलेल्या ट्विटवरून आव्हाड यांनी जोरदार टोला लगावला आहे. 'तुम्ही पेट्रोल भरलं नाहीए की बिल पाहिलं नाहीए? अमिताभजी, तुम्हाला बोलण्याची संधी आहे. तुम्ही पक्षपाती नसाल, अशी आशा आहे. पेट्रोल, डिझेलचे दर प्रचंड वाढले आहेत. आता मुंबईकरांनी कार चालवावी की जाळावी?' असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
अमिताभ बच्चन यांच्याआधी आव्हाड यांनी अक्षय कुमारलादेखील अशाच प्रकारे खोचक सवाल केला होता. २०११ साली काँग्रेस सत्तेत असताना इंधन दरवाढीवरून अक्षय कुमारनं एक ट्विट केलं होतं. 'मुंबईकरांनी पेट्रोल पुन्हा महागण्याआधी पेट्रोल पंपांवर लांबलचक रांगा लावल्या आहेत. त्यात अडकल्यानं मला रात्री घरीही जाता आलं नाही,' असं अक्षयनं त्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. आव्हाड यांनी याच ट्विटला टॅग करून अक्षयला खोचक प्रश्न विचारले आहेत.
R u not active on @Twitter ...
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 25, 2020
Have u stopped using cars..
Dnt u read news paper....@akshaykumar ....
There has been a steep #PetrolDieselPriceHike just for Ur information https://t.co/f5Dr1UPFhs
'अक्षय, तू ट्विटरवर सक्रिय नाहीस का? तू कार वापरणं बंद केलं आहेस का? तू वर्तमानपत्र वाचत नाहीस का? देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे, हे मी तुला तुझ्या माहितीसाठी सांगतो आहे,' असं आव्हाडांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. नऊ वर्षांपूर्वी इंधन दरवाढीवर बोलणाऱ्या अक्षयनं आताही व्यक्त व्हावं, अशी अपेक्षा आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे.
अक्षय, तू आता कार वापरत नाहीस का?; ९ वर्षांपूर्वीच्या 'त्या' ट्विटवरून आव्हाडांचा टोला