मुंबई : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी आज अखेर भाजपामध्ये प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून सुजय विखे-पाटील यांना अहमदनगरची जागा देण्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरु होती. मात्र, अहमदनगरची जागा राष्ट्रवादीने सुजय विखे-पाटील यांना देण्यास नकार दिल्यामुळे अखेर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
सुजय विखे-पाटील भाजपामध्ये गेल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावरुन भाजपावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. पालकांनी विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादीच्या पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सुजय विखे-पाटील यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी सुजय विखे-पाटलांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सुजय विखे-पाटलांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. अहमदनगरच्या विखे-पाटलांची नवी पिढी आता भाजपात गेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे-पाटलांच्या भाजपा प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
अहमदनगरमध्ये भाजपाचा उमेदवार निवडून येईल. अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांचे मी विशेष आभार मानतो, अहमदनगरमध्ये भाजपा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुजय विखे-पाटलांनी सांगितले. आई-वडिलांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घ्यावा लागल्याची खंत आहे, असेही यावेळी सुजय विखे-पाटील म्हणाले. दरम्यान, सुजय विखे-पाटलांच्या या पक्ष प्रवेशादरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे, बबनराव पाचपुते आदी नेते उपस्थित होते.