Rajya Sabha Election 2022: “राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करायचेय, परवानगी द्या”; नवाब मलिकांची कोर्टाला विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 01:02 PM2022-06-06T13:02:30+5:302022-06-06T13:03:50+5:30
Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष उभा ठाकला आहे.
मुंबई: आताच्या घडीला राज्यासह देशभरात राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. भाजपने अतिरिक्त उमेदवार दिल्याने या निवडणुकीतील चुरस वाढल्याचे बोलले जात आहे. तर, भाजप घोडेबाजार करणार असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. याला भाजप नेत्यांनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे. यातच आता आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी मिळण्यासाठी विनंती अर्ज केला आहे.
राज्यसभेची निवडणूक आहे. मतदान करायचे आहे. त्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज नवाब मलिक यांनी आपल्या वकिलांच्यामार्फत ईडीच्या कोर्टात केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामार्फतही राज्यसभा निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठीचा विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आपलाही अर्ज दाखल करून घेण्यात यावा, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. राज्यसभेच्या ६ जागांसाठी येत्या १० जूनला निवडणूक होणार आहे.
दोन्ही बाजूंकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष उभा ठाकला आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत निवडणुकीच्या तयारीची बैठक रविवारी झाली. राज्यसभा निवडणुकीची पूर्वतयारी झाली असून, सर्व रणनीती, कार्यपद्धतीची ब्लू प्रिंट तयार असल्याचे भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीसाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भाजपने निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. रेल्वेमंत्री वैष्णव रविवारी मुंबईत दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयात निवडणूक रणनीतीबाबत महत्त्वाची बैठक झाली. बैठकीला वैष्णव यांच्यासह केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि राज्यसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार पीयुष गोयल, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.
दरम्यान, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नवाब मलिकांना अटक केली होती. प्रकृती अस्वास्थेच्या कारणामुळे नवाब मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तीन दिवसांमध्ये नवाब मलिक यांची चौकशी होऊ शकली नाही. तसेच तपासातून समोर आलेल्या माहितीमुळे मलिकांना ताब्यात घेऊन चौकशी होणे अधिक गरजेचे आहे, असे ईडीतर्फे सांगण्यात आले. या मुद्द्यावरुन न्यायालयाने नवाब मलिकांच्या ईडी कोठडीत वाढ केली होती. अनिल देशमुख आणि नवाब मलिक सध्या ई़डी कोठडीत आहेत.