मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना ८१ वा वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नेहरू सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विविध नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांचे कौतुक केले.
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, शरद पवार हे शेतकऱ्यांबद्दल तळमळीने बोलतात म्हणून नाही, तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करुन दाखवलं आहे. ५० वर्षांपूर्वी आपण अन्नधान्याच्या वस्तू आयात करायचो. पण आज या देशातून लाखो कोटींच्यावर अन्नधान्य निर्यात करत आहोत. इतके महत्त्वपूर्ण योगदान कृषी क्षेत्रात शरद पवारांनी दिले आहे. हे योगदान सामान्य माणूस आणि शेतकरी कधीही विसरू शकणार नाही, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांबाबत एक किस्सा देखील सभागृहात उपस्थित असलेल्या नेत्यांना सांगितला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला सांगितलं की, शरद पवारांना सांगा कोरोनामध्ये इतके फिरू नका, ते जिकडं-तिकडं जात आहेत. पूर आला, वादळ आलं ते त्याठिकाणी जात आहेत. त्यांना म्हणावं, थोडी तब्येतीची काळजी घ्या. परंतु मी त्यांना म्हटलं ते कुणाचे ऐकत नाहीत. कायम जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
दरम्यान, शरद पवार एखाद्या तरुणासारखे सक्रिय आहेत. जनतेशी थेट संवाद असलेले हवेत गप्पा न मारणारे आणि आजही तरुणांना लाजवतील असे काम करणारे नेते म्हणजे पवार आहेत. त्यांनी कृषी, संरक्षण क्षेत्रात ठोस पावले उचलली. महाराष्ट्राने देशाला जी काही नेतृत्व दिली, त्यात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवार आहेत, या शब्दांत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या.
आमच्या नेत्याला पाच लाखाचा सूट घालावा लागत नाही- खासदार अमोल कोल्हे
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांबाबत कौतुकोद्गार काढले. शरद पवार हे शाहू महाराजांचे वैचारिक वारसदार आहेत. महिलांना लष्करात भरती, राजकारणात आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्याची अमंलबजावणी केली. याच महिलांना आज प्रगतीची शिखरे गाठली आहेत, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. तसेच शरद पवार हे गेली ४० वर्ष दिल्लीतील राजकारणाची ओळख बनून राहिले आहेत. आमच्या नेत्याला पाच लाखाचा सूट घालावा लागत नाही. हजारो रुपयांचे तैवानी मशरुम खावे लागत नाही, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोलाही लगावला.
२०२४ नाही, त्यापुढचा विचार करा- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
विचारांची लढाई उभी करायची असेल, तर गावागावात जाऊन विद्यार्थ्यांचे, तरुणांचे मार्गदर्शन घ्यावे. विद्यार्थी राष्ट्रवादीला आम्ही एवढेच सांगतो की, २०२४ चा विचार करू नका. त्यापुढचा विचार करा. लोकापर्यंत पोहोचण्यासाठी तळागाळातल्यांशी संवाद साधावा. काँग्रेस पक्षाने सेवादल नावाची संघटना स्थापन केली. महात्मा गांधींचा विचार त्यामागे होता, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.