मुंबई- अनेक दिवसांपासून रखडलेली पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा व गडचिरोली या सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही यादी जाहीर केली. मुंबईत मंगलप्रभात लोढा हे एकमेव मंत्री आहेत. त्यांना मुंबई उपनगरचे पालकमंत्रिपद दिले असून दीपक केसरकर यांच्याकडे मुंबई शहराचे व कोल्हापूरचे पालकमंत्रिपद देण्यात आले. ते शिंदे गटाचे आहेत.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना कोणत्याही जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली नाहीय. यामध्ये अपक्ष आमदार बच्चू कडू यांचाही समावेश आहे. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी टोला लगावला आहे. संजय शिरसाट यांची गुवाहाटी जिल्ह्याच्या ,तर बच्चू कडू यांची सुरत जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन...५० खोके! एकदम ओके, असं म्हणत वरपे यांनी दोघांना टोला लगावला आहे.
दरम्यान, शंभूराज देसाई यांना सातारा या गृहजिल्ह्याचे पालकमंत्रिपद देतानाच मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्याचीही जबाबदारी मिळाली. ठाणे जिल्ह्यातील भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पालघर व सिंधुदुर्ग सोपविण्यात आले. रत्नागिरीचे उदय सामंत यांना त्यांचा गृहजिल्हा मिळाला. चंद्रकांत पाटील यांना पुण्याचे पालकमंत्रिपद मिळाल्याने फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
पाहा पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी
- दीपक केसरकर- मुंबई शहर, कोल्हापूर
- मंगलप्रभात लोढा- मुंबई उपनगर
- राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर
- सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर,गोंदिया
- चंद्रकांत पाटील- पुणे
- विजयकुमार गावित- नंदुरबार
- गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड
- गुलाबराव पाटील- जळगाव, बुलढाणा
- दादा भुसे- नाशिक
- संजय राठोड- यवतमाळ, वाशिम
- सुरेश खाडे- सांगली
- संदिपान भुमरे-औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
- उदय सामंत- रत्नागिरी, रायगड
- तानाजी सावंत- परभणी, उस्मानाबाद(धाराशिव)
- रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग
- अब्दुल सत्तार- हिंगोली
- अतुल सावे- जालना, बीड
- शंभूराज देसाई- सातारा, ठाणे