मुंबई- मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी–गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी यादरम्यान केलं. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांकडून टीका होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी देखील भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यापुढं ठेवून मुंबईसंदर्भात काल राज्यपाल महोदयांनी मांडलेला नवीन ‘सिद्धांत’ ऐकूण आश्चर्य वाटलं नाही. कारण आजवर IFSC सेंटर, बुलेट ट्रेन, शिपयार्ड (ही लांबलचक यादी आहे) अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा वारंवार प्रयत्न झाला आहे, असं रोहित पवार म्हणाले. आता तर मराठी अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय पण महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही. मुंबईचं आजचं स्थान हे सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांमुळे आहे. पण त्यात भेदभाव करुन मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करा, असं म्हणायलाही कदाचित भेदभाव करणारे कमी करणारा नाहीत.
वास्तविक सर्वांना सामावून घेण्याइतकं समुद्रासारखं विशाल मन मुंबई व महाराष्ट्राचं आहे. याचा गैरफायदा घेत समुद्राच्या काठावर राहणाऱ्या मोठ्या व्यक्तीकडून मराठी माणसाला कमी लेखण्याचा आणि भाषा व प्रांतवाद निर्माण करण्याचा होणारा प्रयत्न दुर्दैवी व महाराष्ट्राच्या भावना दुखावणारा आहे. जबाबदार पदावरील व्यक्तीने वादग्रस्त वक्तव्ये करण्यापेक्षा विश्वासदर्शक ठरावासाठी तातडीने अधिवेशन बोलावण्याच्या निर्णयाप्रमाणे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जनतेला मदत करण्याबाबत सरकारला तातडीने पत्र पाठवण्याची आज खरी गरज आहे, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते राज्यपाल?
“कधी कधी मी लोकांना सांगतो महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबई ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते आर्थिक राजधानीही म्हटलं जाणार नाही,” असं कोश्यारी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.