मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट- क आणि गट- ड साठी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लेखी परीक्षा घेण्याचे काम न्यासा या संस्थेला देण्यात आले होते. त्या संस्थेने पूर्वतयारीसाठी आणखी वेळ हवा आहे, असे म्हणत ऐनवेळी परीक्षा घेण्यास नकार दिला. त्यामुळे शनिवार आणि रविवारी होणाऱ्या परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, राज्य सरकारच्या या घोषणेमुळे परीक्षार्थींकडून तीव्र संताप व्यक्त झाला आहे.
आरोग्य विभागाच्या परिक्षा रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी देखील ट्विट करत राज्य सरकारवर नाराजी दर्शवली आहे. रोहित पवार म्हणाले की, मागील सरकारने आरोग्य भरती रखडवल्याने आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली. आपल्या सरकारने आरोग्य भरती सुरू केली पण गोंधळाचं वातावरण दिसतंय. असंच चालू राहिलं तर आधीच्या आणि आपल्या सरकारमध्ये काय फरक राहील? याचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा, असं सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे.
परीक्षा सुरळीत होणं आवश्यक होतं. अनेकांची आर्थिक स्थिती सामान्य आहे. परीक्षेला जाण्यासाठी त्यांनी उसने तर काहींनी व्याजाने पैसे आणले,परंतु आता त्यांना आर्थिक भुर्दंड बसलाय. त्यामुळं पुन्हा लवकर परीक्षा घ्यावी आणि त्यावेळी मोफत एसटी प्रवासाचा पर्याय देता येईल का,याचा विचार व्हावा. तसंच पारदर्शकतेसाठी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या देखरेखीत परीक्षा घेण्याबाबत विचार व्हावा. सध्या प्रत्येक पदासाठी व प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी फी आकारली जाते, हे योग्य नाही. सरकारने यात लक्ष घालून परिक्षार्थींच्या हिताचा निर्णय घ्यावा, ही विनंती, असल्याचं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.
दरम्यान, परीक्षा १०० टक्के होणारच, परीक्षा रद्द झाली नसून ती पोस्टपोन करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना जो मानसिक त्रास झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली आहे. वास्तविक परीक्षांचा थेट संबंध आरोग्य विभागाशी नाही. आयटी विभागाने निवड केलेल्या कंपनीच्या अधिपत्याखालील हा विषय आहे. पण, आमच्या विभागातील नोकरीचा विषय असल्याने बैठक घेऊन आम्ही परीक्षेची तारीख निश्चित करू, असे राजेश टोपेंनी स्पष्ट केले.
दलाल घुसल्यामुळेच परीक्षा रद्द-
भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या परीक्षेतील घोळाबाबत मोठा आरोप केला आहे. या प्रक्रियेत दलाल घुसल्यामुळेच आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांकडे ५, १० ते १५ लाख रुपयांची मागणी करुन भरती करण्याचे आश्वासन दिले जात आहे, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.
आरोग्य विभागाच्या परीक्षेत प्रचंड घोळ घातला आहे. प्रवेश पत्र देताना कुणाला उत्तर प्रदेश तर कोणाला इतर ठिकाणचे प्रवेश पत्र दिले. पण आम्हाला माहिती यात मिळाली आहे की आरोग्य विभागाच्या परीक्षेत भरतीसाठी दलाली केली जात आहे. आदल्या रात्री विद्यार्थ्यांना समजतय की परीक्षा रद्द होऊन पुढे ढकलण्यात आली आहे. या सरकारचा घोळ काही समजत नाही. या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे, विद्यार्थ्यांचे नुकसान बंद करा, अन्यथा आंदोलन करु, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.