उशिरा का होईना, १८ वर्षांपुढील सर्वांना लस मोफत देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला- रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 09:51 PM2021-06-07T21:51:30+5:302021-06-07T21:52:13+5:30
उशिरा का होईना 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला, याचं स्वागत आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
मुंबई: भारतात गेल्या 100 वर्षात अशी महामारी आली नव्हती. या महामारीच्या संकटाचा सामना करतानाच भारताने गेल्या एका वर्षात दोन मेड इन इंडिया व्हॅक्सिन बनवून दाखवल्या आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. देशात आतापर्यंत 23 कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. तसेच लस तयार करणाऱ्या कंपन्यांना हवं तेवढं सहकार्य केलं, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. नरेंद्र मोदींनी आज देशातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
केंद्र सरकारच यापुढे सर्व वयोगटाचे लसीकरण करणार आहे. राज्यांना दिलेली 25 टक्के जबाबदारी देखील भारत सरकार उचलणार आहे. दोन आठवड्यांत ही व्यवस्था लागू केली जाईल. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवशी 18 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राज्यांना मोफत लस देणार आहे. देशातील कोणत्याही राज्य सरकारांना एकही रुपया खर्च करावा लागणार नाही, अशी घोषणा मोदी यांनी केली. नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी स्वागत केलं आहे.
रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, स्वतंत्र भारतातील प्रत्येक सरकारने देशातील प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रकारचं मोफत लसीकरण केलं. मात्र कोरोना लसीकरणात या धोरणापासून केंद्र सरकारने फारकत घेतली होती. पण उशिरा का होईना 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला, याचं स्वागत आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
यासंदर्भात मी सुप्रीम कोर्ट, केंद्रातील विरोधी पक्षातील नेते आणि काही राज्यांचे मुख्यमंत्री या सर्वांचे आभार मानतो!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 7, 2021
केंद्र सरकार मोफत लस उपलब्ध करुन देणार असलं तरी ज्यांना पैसे देऊन खासगी रुग्णालयांकडून लस घ्यायची असेल त्यांचाही विचार करण्यात आल्याचं मोदी म्हणाले. ज्यांना पैसे देऊन लस घ्यायची आहे त्यांच्यासाठी एकूण लस उत्पादनापैकी 25 टक्के लस खासगी रुग्णालयांना उपलब्ध करुन दिल्या जातील. पण यावर लसीकरणासाठी लसीच्या किमतीच्यावर सेवा कर म्हणून रुग्णालयांना प्रत्येक डोसमागे 150 रुपयांपेक्षा अधिक सेवा कर आकारता येणार नाही. यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारांनी घ्यावी, असं पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलं आहे.
नियत, निती आणि परिश्रम-
कोरोना काळात भारतानं केलेल्या कामाचं कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारनं आजवर घेतलेल्या निर्णयांची आणि योजनांची माहिती दिली. "जेव्हा नियत साफ असते, निती स्पष्ट असते आण, निरंतर परिश्रम एखादा देश करतो तेव्हा त्याचं फळ मिळतंच. भारताने एका वर्षाच्या आत 'मेड इन इंडिया' दोन लस आणल्या. देशात सध्याच्या घडीला 23 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. भारतासारख्या मोठ्या देशात आज जर लस निर्मिती झाली नसती तर किती मोठं संकट उभं राहिलं असतं याचा विचारही करवत नाही", असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
दिवाळीपर्यंत गरीबांना मोफत धान्य-
मोफत लसीकरणासोबत पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊनमुळे देशातील गरीब नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली मोफत धान्य वाटपाची योजना यापुढील काळातही सुरू राहणार असल्याचं सांगितलं. देशातील गरीब नागरिकांना मोफत धान्य वाटप दिवाळीपर्यंत म्हणजेच नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत नागरिकांना मोफत धान्य उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. याचा देशातील 80 कोटी नागरिकांना फायदा होणार असल्याचं मोदींनी सांगितलं.