'तुम्हाला यामधून काय सिद्ध करायचं आहे?'; रुपाली पाटलांचा एकनाथ शिंदेंना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 02:21 PM2022-08-23T14:21:07+5:302022-08-23T14:21:16+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई/पुणे- तुमचा सगळा प्रवास मला माहिती आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सोमवारी विधानसभेत निशाणा साधला. देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावर तेव्हा ‘प्रेम, दया, करुणा’ दाखवली. पण, परत परत ती दाखविता येणार नाही, असे सूचक उद्गार शिंदे यांनी मुंडेंबाबत काढले होते. एकनाथ शिंदेंच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबर यांनी टीका केली आहे.
काय दिवस आलेत आपल्या महाराष्ट्राला...मुख्यमंत्री साहेब सभागृहात आमदारांच्या संमतीचे लफडे, अनौतिक संबंध यावर बोलतात, काय सिद्ध करायचे आहे, काय उद्दिष्ट्ये आहेत. व्यक्तिगत लफडयात, अनैतिक संबधात असा कोणता महाराष्ट्राचा विकास, प्रगती करायची आहे ते तरी सांगा?, असं रुपाली पाटलांनी म्हटलं आहे.
शेती प्रश्न, उद्योगधंदे, शिक्षण, बेरोजगारी, कष्ट करणाऱ्या कर्तृत्वान माता भगिनी, उज्वल भविष्य असलेल्या आपल्या लेकीबाळी यांच्यावर दाखवा त्याची नितांत गरज आहे, असं म्हणत आम्ही महिला स्त्री शक्ती ,आया बहिणी आयुष्यभर ऋणी राहू, असंही रुपाली पाटील यांनी फेसबुकद्वारे म्हटलं आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री शिंदे विधान भवनाच्या पायऱ्या चढत असताना जोरदार घोषणाबाजी गेल्या आठवड्यात केली होती. ‘पन्नास खोके, एकदम ओके’,‘ताट, वाटी चलो गुवाहाटी’ अशा घोषणा देण्यात मुंडे पुढे होते. आज थेट नगराध्यक्ष निवडीसंबंधीच्या विधेयकावर बोलताना शिंदे यांनी मुंडे यांना लक्ष्य केले. धनंजय मुंडे परवा मोठमोठ्याने ओरडत होते, ‘चलो गुवाहाटी... चलो गुवाहाटी...’ अगदी बेंबीच्या देठापासून ते ओरडत होते. जणू काय ते खूप वर्षांपासूनचे शिवसैनिक आहेत. आता, यांच्याबद्दल काय बोलावे, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते.