मुंबई- गेले काही दिवस मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढलेली असतानाच राज यांच्या वतीने शिवाजी पार्कवर आयोजित दीपोत्सवाला शुक्रवारी दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच राज ठाकरे यांनी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची भूमिका शिंदे, फडणवीस यांनी घेतल्याचे अलीकडे दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी भाजपा आणि मनसेवर निशाणा साधला आहे.
दिवाळीच्या कार्यक्रमांसाठी कोणीही कुठेही उपस्थित राहू शकतं. पण मनसेच्या सुख दुखात उभं राहत असताना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी अंतरकरणाने उभं रहावं, असं रुपाली पाटील म्हणाल्या. युती असेल तर कृपया करुन ती जगजाहीर करा. नसेल तरी देखील जगजाहीर करा. छुप्या पद्धतीने जे काही कटकारस्थान चालतात, त्यामधून संभ्रम निर्माण करणे, राजकारणाचा दर्जा खालावण्यासारखे प्रकार होऊ नये, असं आम्हाला वाटत असल्याचं रुपाली पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, राज ठाकरेंच्या निमंत्रणाला मान देऊन मी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दीपोत्सव कार्यक्रमाला आलो होतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. दीपोत्सव कार्यक्रमाचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. दिवाळी आपली संस्कृती आहे. दरवर्षी प्रमाणे मनसेने दीपोत्सव कार्यक्रम केला आणि त्या निमित्त दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो होतो, असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
शिवतीर्थ बंगल्यावर १० मिनिटे चर्चा
कार्यक्रमापूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस हे आधी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या बंगल्यावर गेले, काही मिनिटांत मुख्यमंत्रीही गेले. त्यानंतर तिघांची दहा मिनिटे चर्चा झाली आणि नंतर तिघे शिवाजी पार्कवर गेले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिदे यांनी शिवाजी पार्कवर असलेल्या दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"