Join us

Big Breaking: सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश, राष्ट्रवादीला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 11:41 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधत बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं सचिन अहिर यांनी सांगितलं आहे. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला मुंबईत मोठं भगदाड पडलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना वाढवण्याचं काम मी करणार आहे. मला असंख्य कार्यकर्त्यांचा फोन येत आहे.आम्हाला पक्ष फोडायचा नाही, तर पक्ष वाढवायचा आहे. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत आल्याचं सचिन अहिर यांनी सांगितलं आहे. आदित्य ठाकरेंच्या कामानं मी प्रभावित झाल्याचंही ते म्हणाले आहेत. कोणत्या जागेवरून कोणाला लढवलं पाहिजे हा निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्थान माझ्या हृदयात कायम आहे. पण यापलीकडे जाऊन काही निर्णय घ्यावे लागतात, असे शिवसेनेत प्रवेश करण्याआधी सचिन अहिर यांनी सांगितले होते.कोण आहेत सचिन अहिर ?सचिन अहिर हे राष्ट्रवादीचे नेते होते. 21 मार्च 1972 रोजी त्यांचा जन्म झाला. कुख्यात गँगस्टार अरुण गवळी यांचे ते भाचे होत. अरुण गवळीच्या मदतीनं सचिन अहिर हे 1999मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावरून शिवडी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. 2009मध्ये वरळी विधानसभा मतदारसंघाचंही प्रतिनिधित्व केलं होतं. काँग्रेस आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृहनिर्माण मंत्री, झोपडपट्टी सुधारणा, घर दुरुस्ती आणि पुनर्निर्माण, उद्योग, खाण, सामाजिक न्याय, इतर मागासवर्गीय वर्गाचे मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात परिवहन आणि पर्यावरण, संसदीय कार्यमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता.  

टॅग्स :सचिन अहिर