शरद पवार अन् राज ठाकरे पुन्हा एकाच मंचावर येणार; संजय राऊतही सामील होणार
By मुकेश चव्हाण | Published: October 24, 2020 04:15 PM2020-10-24T16:15:07+5:302020-10-24T16:27:08+5:30
तिन्ही पक्षांचे हे दिग्गज नेते एकाच मंचावर येणार आहे.
मुंबई: प्रख्यात लेखक अंबरिश मिश्र यांच्या ‘चौकात उधळले मोती’या अंबरिश मिश्र लिखित पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे. या प्रकाशन सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मनसेप्रमुख राज ठाकरे, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांचे हे दिग्गज नेते एकाच मंचावर येणार आहे.
राज ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवार यांनी जाहीर मंचावर एकत्र येण्याची नजीकच्या काळातील कदाचित ही पहिलीच वेळ असावी. उत्तम वक्ते असलेले तिघेही कोणती टोलेबाजी करणार तसेच तिघांमध्ये कोणत्या गप्पा रंगणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आता रंगू लागली आहे.
पत्रकार, लेखक अंबरीश मिश्र यांनी आज भेट घेतली. 'चौकात उधळले मोती' हे त्यांचे नुकतेच प्रकाशित होत असलेले पुस्तक त्यांनी भेट दिले. धन्यवाद. pic.twitter.com/GhcMGbD2xO
— Supriya Sule (@supriya_sule) October 21, 2020
दरम्यान, याआधी संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून ठाकरे ब्रँडसाठी साद घातली होती. ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरेही ठाकरे या ब्रँडचेच घटक आहेत. या सगळ्याचा फटका त्यांनाही भविष्यात बसणार आहे. शिवसेनेसोबत त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, असं संजय राऊत यांनी म्हटले होते.
राज ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनीही शरद पवार यांची जाहीर मुलाखत घेतलेली आहे. पुण्यात 2017 मध्ये राज ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली ‘महामुलाखत’ चांगलीच गाजली होती.