मुंबई: राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांची तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने अटक केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील अन्य पक्षांकडूनही प्रतिक्रिया येत असून, भाजपवर टीका केली जात आहे. नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही भाजपवर निशाणा साधत, ईडी आणि भाजपवाले एकच असून, ते एकत्रितपणे काम करत आहे, हे दिसत आहे. आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, कोणासमोर झुकणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापरकरून लोकांना त्रास द्यायचा, त्यांना भीती दाखवायची. आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकला नाही आणि झुकणारही नाही. संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष आणि आम्ही सर्व नवाब मलिक यांच्या सोबत आहोत. आजही होतो उद्याही राहू आणि आमची लढाई सुरूच ठेवू, अशी आक्रमक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
ईडी आणि भाजप एकत्र काम करतात
ईडीची धाड पडणार आहे, हे भाजप लोकांनी आधीच सांगितले होते. म्हणून आश्चर्य वाटले नाही. मात्र ते इतका अतिरेक करतील, असे वाटले नव्हते. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात इतकी टोकाची भूमिका कोणीच घेतली नव्हती. भाजपमधील काही लोक, त्यांचे नेते आणि मंत्री सातत्याने ट्विट करत होते की, १५ दिवसांनी अटक होईल, १५ दिवसांनी रेड पडेल, अर्थातच आता हे खरे झाले आहे. ईडी आणि भाजप एकत्र काम करतात, किंवा एकच आहेत, असा आता अर्थ काढावा लागेल, अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या.
दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांची ही कारवाई सूडबुद्धीनेच केली जात आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये काय चाललेय, हे संपूर्ण देश आणि देशातील जनता पाहत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कायदेशीर आणि राजकीय लढाई लढू, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.