Join us

मी भूमिका मांडल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर भाजपात राहणार नाहीत; राष्ट्रवादी नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 4:11 PM

गोपीचंद पडळकर यांच्यात एवढी ताकद असेल तर त्यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा केंद्र सरकारकडून सोडवून आणावा असं उत्तमराव जानकर म्हणाले.

ठळक मुद्देशरद पवारांवर पडळकरांनी जे विधानं केले तसे आम्हालाही करता येतातगोपीचंद पडळकर यांच्यात एवढी ताकद असेल तर धनगर आरक्षणाचा मुद्दा केंद्राकडून सोडवावाअशी विधान करुन लोकप्रियता मिळवणं चुकीचं आहे

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केल्यानंतर चर्चेत आलेल्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल राजकारण आणखी पेटू लागले आहे. एकेकाळी गोपीचंद पडळकर यांच्यासोबत धनगर समाजासाठी झटणारे राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनीही गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

याबाबत उत्तमराव जानकर यांनी व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं आहे की, धनगर आणि धनगड या शब्दातील दुरुस्ती आमदार गोपीचंद पडळकर यांनी केंद्र सरकारकडून करुन आणावी. महाराष्ट्र सरकार त्याची अंमलबजावणी करेल याची जबाबदारी मी घेतो. पवारांवर पडळकरांनी जे विधानं केले तसे आम्हालाही करता येतात, आरक्षण देतो म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना दगलबाज म्हणता येते, देवेंद्र फडणवीस यांना भामटा म्हणता येते, परंतु ते आमच्या संस्कृतीत बसत नाही, अशी विधान करुन लोकप्रियता मिळवणं चुकीचं आहे असा टोला त्यांनी गोपीचंद पडळकर यांना लगावला.

तर धनगर आरक्षणाचा प्रश्न केंद्राच्या अख्यारित आहे, मुंबई उच्च न्यायालयात हा प्रश्न सुरु आहे, त्यावर आमचं लक्ष आहे. गोपीचंद पडळकर यांच्यात एवढी ताकद असेल तर त्यांनी केंद्र सरकारकडून हा मुद्दा सोडवून आणावा. येणाऱ्या ८-१० दिवसात पत्रकार परिषदेत माझी भूमिका मांडेन, परंतु गेल्या ५ वर्षात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाशी जी बेईमानी केली ती मांडल्यानंतर गोपीचंद पडळकरही भाजपात राहणार नाही याची मला खात्री आहे असा दावा राष्ट्रवादी नेते उत्तमराव जानकर यांनी केला आहे. उत्तमराव जानकर यांनी मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढवली होती.

शरद पवारांवरील टीकेनं वादंग

आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली होती, शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असं ते म्हणाले होते, त्यामुळे पडळकरांच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून गोपीचंद पडळकरांनी माफी मागावी अन्यथा त्यांना राज्यभरात कुठेही फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत शत्रू नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. याबाबत मी गोपिचंद पडळकर यांच्याशी बोललो आहे. भावनेच्या भरात आपण हे विधान केल्याचे पडळकर यांनी मान्य केले आहे. याबाबत ते लवकरच स्पष्टीकरण देतील असं फडणवीस म्हणाले होते.

टॅग्स :गोपीचंद पडळकरधनगर आरक्षणराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार