मुंबई: भाजपाचे नेते आणि साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' या वादग्रस्त पुस्तकावर बोलताना शिवसेनेवर निशाणा साधला. तसेच जाणता राज फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजचं असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली आहे. उदयनराजेंच्या या टीकेला मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 'होय शरद पवार हे जाणता राजाच' असं म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा शरद पवार यांचा अभ्यास आहे. राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रीयांचे प्रश्न आदी प्रश्नांची उत्तरे शरद पवार यांच्याकडे असल्याचे आव्हाड यांनी म्हटले. शरद पवार यांची करंगळी पकडून अनेकजण राजकारणात आले. अनेकांनी त्यांच्यावर टीका करून राजकारणात प्रस्थापित झाले असल्याचा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. तसेच कुणाच्या घरात मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर काय एनओसी साताऱ्यातून मागवायची का? शिवरायांच्या प्रेमापोटीच हे नाव ठेवलं जातं असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.
शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा! उदयनराजेंचा खोचक सल्ला
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलताना उदयनराजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना अनेकदा केली जाते. लाेकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का माहीत नाही. पुस्तक पाहून वाईट वाटलं. शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटलं. हे जे पुस्तक प्रकाशित झालं. गाेयल यांनी माेदींची तुलना महाराजांशी केली. जगात महाराजांची बराेबरी करण्याची उंची काेणाची नाही असं उदयनराजेंनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांशी काेणीही बराेबरी करु शकत नाही : उदयन राजे
जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज. अनेकांना जाणता राजाची उपमा देतात. त्याचाही मी निषेध करतो असं म्हणत शरद पवारांवर देखील उदयनराजेंनी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. तसेच शिवसेना भवनावर बाळासाहेबांचा फोटो शिवरायांच्या वर का?,असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला. पक्षाला शिवसेना नाव दिलं, तेव्हा शिवरायांच्या वंशजांना विचारायला आला होतात का? महाशिवआघाडीमधून शिव शब्द का काढला? सोयीप्रमाणे राजकारण करायचं ही यांची लायकी. शिववडा नावाचा वडापाव सुरु करण्यात आला. शिवाजी महाराजांचं नाव वडापावला कसं देता? आम्ही शिवसेना नावाला कधीही हरकत घेतली नाही असं उदयनराजे यांनी सांगितले. तसेच शिवसेनेनं नाव बदलून ठाकरे सेना करावं असा खोचक सल्ला देखील उदयनराजेंनी यावेळी दिला.