Join us

OBC Reservation: "छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाबद्दल जे बोलतात ते जनतेपर्यंत पोहोचवा"; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 8:03 PM

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत या भूमिकेवर राष्ट्रवादी ठाम

Jayant Patil on OBC Reservation : ओबीसींच्या आरक्षणाविषयी राज्याचे मंत्री छगन भुजबळ एकटेच बोलत आहेत. पण ओबीसी सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे की, त्यांनी देखील गावागावात, जिल्ह्यात जाऊन हे सारं बोलले पाहिजे. छगन भुजबळ जे बोलतात, ते जनतेमध्ये जाऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवा. महाराष्ट्रातील ओबीसी समाजात जनजागृती निर्माण करायची असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात पुढे असली पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ओबीसी आरक्षणाबाबत पक्षाची भूमिका मांडली. ते राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनात बोलत होते.

"ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होऊ नयेत, ही राष्ट्रवादी काँग्रेसची आग्रही मागणी आजही आहे. सुप्रीम कोर्टाने कोणताही निकाल दिला असला तरी कोर्टाच्या चौकटीत बसवून आरक्षणासहीत निवडणूका घेण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी ओबीसी समाजाला मदत करण्याचे काम आपल्याला करायचे आहे. ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी न्यायालयीन लढाईवर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे", असे पाटील म्हणाले.

"ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी देखील होत आहे. परंतु मी सांगू इच्छितो की, २०११ सालीच जातनिहाय जनगणना झालेली आहे. मी त्यावेळी ग्रामविकास मंत्री असल्यामुळे मला याची माहिती आहे. २०१४ साली त्याचा तपशील देखील केंद्र सरकारकडे देण्यात आला होता. मात्र तो तपशील नंतर आलेल्या सरकारने बाहेर काढला नाही. त्यामुळे देशात जातनिहाय जनगणनेचा तपशील बाहेर आला तर आपल्याला सबळ पुराव्याची व्यवस्था होईल. मात्र सध्या हे होईल, असे वाटत नाही", असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

"राष्ट्रवादी ओबीसी सेलमार्फत काही ठराव करण्यात आले आहेत. या सर्व ठरावांना पुर्णपणे पाठिंबा देत ओबीसींच्या अनेक जाती आणि बारा बलुतेदारांचे अनेक प्रश्न आहेत. या ठरावांचा तपशील घेऊन राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत बसून यावर निकाल काढण्याचा नक्कीच प्रयत्न करु", असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले. 

टॅग्स :ओबीसी आरक्षणजयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसअन्य मागासवर्गीय जाती