Join us  

ही आहे 'असली मोदी सेना'...राष्ट्रवादीने काढला भाजपाला चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 6:00 PM

भारतीय लष्कराला मोदींची सेना असं म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने व्यंगचित्राच्या माध्यमातून चिमटा काढला आहे

मुंबई - भारतीय लष्कराला मोदींची सेना असं म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने व्यंगचित्राच्या माध्यमातून चिमटा काढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत ट्विटरवर एक व्यंगचित्र पोस्ट करण्यात आलेलं आहे. यामध्ये ही असली मोदी सेना असा उल्लेख करत भाजपाच्या योगी आदित्यनाथांचे व्यंगचित्र काढण्यात आले आहे. यामध्ये अंधभक्तदल, गोरक्षकदल आणि वाचाळवीरदल अशा तीन मुद्द्यांवरुन भाजपाला टार्गेट करण्यात आले आहे. 

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाकडून एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील बालकोट दहशतवाद्यांना टार्गेट करण्यात आले. त्यानंतर भाजपाकडून आगामी लोकसभा निवडणुकीत मोठ्य़ा प्रमाणात एअर स्ट्राईकचा प्रचारासाठी वापर करण्यात आला. यामध्ये भाजपा नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान करताना भारतीय लष्कराला मोदींची सेना असा उल्लेख केला होता. त्यावर राष्ट्रवादीने टोला लगावला आहे. 

भाजपा नेत्यांची वादग्रस्त विधानांना आणि गोरक्षेच्या नावाखाली होणाऱ्या हत्येविरोधातही राष्ट्रवादी काँग्रेसने व्यंगचित्राच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. अनेक राजकीय नेते भाषणाबाजी करताना काही तरी बरळतात किंवा टोलेबाजीच्या नादात भाषणात काय बोलतोय हेदेखील कळत नाही. अशा जोशात वक्तव्य केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आता केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली होती. या दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणामध्ये एअर स्ट्राईकचा संदर्भ देत भारतीय जवानांनी केलेल्या कामगिरीवर भाष्य करत मोदींची सेना म्हणून लष्कराच्या जवानांचा उल्लेख केला होता. यावरून भाजपाचे हे दोन्ही नेते अडचणीत आले. विरोधकांनीही भाजपा नेत्यांच्या या विधानांवर आक्षेप घेण्यात आला होता. 

उत्तर प्रदेशातील रामपूर येथील भाषणात केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले होते की, मोदींच्या सेनेने दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारले. या वादग्रस्त वक्तव्यावर उत्तर प्रदेशच्या निवडणूक आयोगाकडून त्यांना नोटीस पाठविण्यात आली होती. या विधानाची निवडणूक आयोगाच्या विशेष टीमकडून तपासणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका सभेमध्ये बोलताना भारतीय लष्करी जवानांचा मोदींची सेना म्हणून उल्लेख केला होता. त्यावर विरोधकांनी योगी आदित्यनाथ आणि भाजपावर टीकेचे झोड उठवली होती.  

पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानातील बालकोट भागात दहशतवादी तळांना टार्गेट केले. या एअर स्ट्राईकनंतर संपूर्ण देशात जल्लोष साजरा करण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वामुळे हे शक्य झालं असा प्रचार भाजपाकडून केला जाऊ लागला. यातून भाजपाचे नेते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वारंवार एअर स्ट्राईकचा उल्लेख करताना अशी वादग्रस्त विधान करत आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने आचारसंहितेत कोणत्याही राजकीय पक्षांनी प्रचारात लष्कराचा फोटो वापरु नये असं बजावलं आहे.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०१९राष्ट्रवादी काँग्रेसभाजपामहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019