मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अदिती तटकरे यांचा १६ मार्च रोजी वाढदिवस होता. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींमार्फत आज त्यांचा वाढदिवस विधानभवन परिसरात साजरा करण्यात आला.
अदिती तटकरे यांचा वाढदिवस साजरा करताना त्याचक्षणी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे विधान भवनात दाखल झाले. यावेळी त्यांनीही अदित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांनी आदित्य ठाकरे यांना केक द्या, असं सांगितल्यास अदिती तटकरे यांनी केकवरील चेरी उचलत, 'आदित्यची चेरी तुम्हालाच', असं म्हटलं.
दरम्यान, अदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राज्यशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क अशा विविध खात्यांचा त्यांनी पदभार सांभाळला.
शरद पवारच आदर्श
राजकारणात यायचं ठरवलं नव्हतं. वडील राजकारणात होते. त्यामुळे घरात राजकारणाचं वातावरण होतं. त्या वातावरणात वाढल्यानेच राजकारणाकडे ओढले गेले. विलासराव देशमुख आणि शरद पवारांना अत्यंत जवळून पाहण्याची संधी मिळाली. शरद पवारांकडे सर्व पिढ्यांशी संवाद साधण्याची कला आहे. माझे आजोबाा, वडील आणि माझ्याशी ते मनमोकळेपणाने संवाद साधतात. शरद पवार हेच माझे राजकारणातील रोल मॉडल आहेत. त्यांना पाहूनच मी राजकारणात आले, असं त्यांनी सांगितलं.
...म्हणून राजकारणात आले-
वडिलांची इच्छा असते मुलांनी राजकारणापासून लांब राहावं. त्यांनी संघर्ष पाहिलेला असतो. पण मी संघटनेत काम करायला सुरुवात केली. तेव्हा मुलगी डॉक्टर किंवा इंजिनीयर होणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनीही मला राजकारणात येण्याची संधी दिली, असं त्या सांगतात. तर, महिलांना राजकारणात मागे ठेवलं जातं असं वाटत नाही. महिला किंवा पुरुष हा दुजाभाव हा बघण्याचा दृष्टिकोण आहे. मला वेगळं खातं आहे. ते जनरल आहे. महिलांशी संबंधित नाही, असं त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.