तिथीनुसार शिवजयंती करणं म्हणजे मतांची दुकानदारी; राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरींचा मनसेला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 12:49 PM2022-03-21T12:49:09+5:302022-03-21T12:50:11+5:30
सर्व महापुरुषांची जयंती तारखेनुसार साजरी होते. मग फक्त शिवाजी महाराजांच्या जयंतीवरून वाद का? असा सवाल राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरींनी मनसेला विचारला आहे.
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त मनसे, शिवसेनेकडून राज्यभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही मराठी माणसांसाठी सण आहे. हा सण तिथीनुसार साजरा करायला हवा असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी(MNS Raj Thackeray) २१ मार्चची शिवजयंती जल्लोषात साजरी करा असं आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. आज मनसेकडून दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर अश्वारुढ शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत पुष्पवृष्टी साजरी करण्यात आली. मात्र यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसेला टोला लगावला आहे.
आमदार अमोल मिटकरी(NCP Amol Mitkari) म्हणाले की, शिवजयंती ही १९ फेब्रुवारीलाच साजरी व्हायला हवी. रोज साजरी झाली तरी हरकत नाही. परंतु आज जी जयंती साजरी करतोय ती मतांसाठी केली जातेय. मला माझं मत मागण्याचा अधिकार आहे. शिवजयंती(Shivjayanti) साजरी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तुमचा वाढदिवस तिथीनुसार साजरा करता का? मनसेचा वर्धापन दिन तिथीनुसार साजरा करता का? छत्रपती शिवाजी महाराज केवळ हिंदुचे होते का? ते सर्वांचे होते. १९ फेब्रुवारीला महात्मा फुले यांनी साजरी केली. १९ फेब्रुवारीच शिवजयंती असावी हे शासनमान्य झालं आहे असं त्यांनी सांगितले.
तर ज्यांना राजमुद्रा पाठ नाही ते आम्हाला शिकवतात. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हणा? आमची अक्कल काढू नका. छत्रपती संभाजीराजे, उदयनराजे यांनीही १९ फेब्रुवारीला साजरी केली. महाराष्ट्रासह देशभरात १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी झाली. मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवजयंतीच्या नावाखाली राजकारण करायचे हे धंदे महाराष्ट्रात बंद झाले पाहिजे. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यामागे राजकारण आहे असं सांगत आमदार अमोल मिटकरींनी मनसेचे नेते अमेय खोपकर यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, सर्व महापुरुषांची जयंती तारखेनुसार साजरी होते. मग फक्त शिवाजी महाराजांच्या जयंतीवरून वाद का? शिवजयंती संपलेली आहे. १९ फेब्रुवारीला ती साजरी करण्यात आली आहे. आज जी जयंती साजरी होतेय त्यातून मतांची दुकानदारी करायची हे आयोजकांचे उद्दिष्ट आहे. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा अट्टाहास कालबाह्य झाला आहे. आपली राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी शिवजयंतीचं नवीन वाद पुढे आणला आहे असा आरोप मिटकरींनी मनसेवर केला. तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही मराठी माणसांसाठी सण आहे. उगाच राजकारण करू नका. फालतु वाद घालू नका. हिंदुंचे सण तिथीनुसार साजरी होतात. कुठल्या गोष्टीवर राजकारण करता याची लाज वाटली पाहिजे असं उत्तर मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिले आहे.