मुंबई: मनसे आणि भाजपा यांच्यात मनोमिलन होणार असल्याच्या चर्चा काही महिन्यांपासून रंगल्या होत्या. पण त्या चर्चा आता हळूहळू कमी होताना दिसत आहेत. याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. आज पनवेल ला राज यांचे भाषण झाले. या भाषणात त्यांनी भाजपाच्या आमदार फोडीच्या राजकारणावर टीका केली. तसेच, अजित पवार यांनी भाजपाने घाबरवून सरकारमध्ये सामील करून घेतल्याची अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी केली. याच वेळी त्यांनी छगन भुजबळांच्या तुरुंगावासाच्या मुद्द्यावरून टोला लगावला.
तुम्ही सरकारमध्ये का सामील झालात, या प्रश्नावर काही जण सांगतात की त्यांना महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. ते लोकं खोटं बोलतात. खरं कारण असं असेल की, पंतप्रधानांनी तिकडे भाषणात ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराची गोष्ट काढली, तेव्हा लगेच सगळे सत्तेत सहभागी झाले. कारण (छगन) भुजबळांनी सांगितलेलं असणार की जेलच्या आतमध्ये काय काय असते. ते म्हणाले असतील की आपण इथे(सत्तेत) जाऊ पण तिथे (जेलमध्ये) नको, अशा खोचक टोला राज यांनी अजित पवार आणि इतर राष्ट्रवादीच्या आमदारांना लगावला.
राज ठाकरेंच्या या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोहिनूर मीलसंदर्भात ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी ज्याप्रकारे टुणकन उडी मारली, तशी टुणकन उडी मारणारा आमचा पक्ष नाही. आम्ही सत्तेबरोबर आहोत, असं अमोल मिटकरी म्हणाले. तसेच राज ठाकरेंकडे फक्त एकच आमदार आहे. तो आमदार त्यांनी सांभाळून ठेवावा. त्यांनी अजित पवारांची मिमिक्री करु नये. त्यांची मिमिक्री आम्हालाही करता येते. पण आम्ही काही बोललो की, त्यांची टोळधाड सुटते, अशी टीका अमोल मिटकरींनी केली आहे.
दुसऱ्यांच्या डोक्याला बंदूक लावून स्वत:च्या पक्षात आणलं जातं...
"अमित ठाकरे जात होता, तिकडे टोल फुटला तेव्हा भाजपाने टीका केली, रस्ते बांधायला पण शिका, उभे करायला शिका. मला असे वाटते भाजपाने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिका. लोकांना घाबरवून, त्यांच्या डोक्याला बंदूक लावून त्यांना स्वत:च्या पक्षात घेतलं जात आहे. या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आणि त्यामुळेच राजकारणाची पातळी खालावली आहे," असा सणसणीत टोला राज यांनी भाजपाला लगावला.
खड्ड्यात घालणाऱ्यांना जनता सतत मतदान कशी करते?
"आज मी तुम्हाला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी आलो आहे. चंद्रयान जे चंद्रावर गेलेय, त्याचा काय उपयोग? तिथे जाऊन खड्डेच पहायचेत, ते महाराष्ट्रात सोडले असते खर्च तरी वाचला असता. हा काही मुंबई गोवा महामार्गाचाच भाग नाहीय. नाशिकच्या रस्त्याचीही तिच अवस्था आहे. हे खड्डे काही आज नाही पडलेत. २००७ साली या रस्त्याचे काम सुरु झाले. काँग्रेसचे सरकार गेले शिवसेना भाजपाचे सरकार आले त्यानंतर कोणा कोणाचे सरकार आले. या खड्ड्यांतून जात असताना त्याच त्याच पक्षातील लोकांना कसे मतदान करता याचे आश्चर्य वाटतेय," असा सवाल राज यांनी मतदारांना विचारला.