अमोल मिटकरींचा स्वभाव अन् वागणं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे; प्रवीण दरेकरांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 12:47 PM2022-08-24T12:47:32+5:302022-08-24T12:47:46+5:30
विधान भवनाच्या पायऱ्यांवर राडा झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.
मुंबई- राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची सुरुवात सत्ताधारी आणि विरोधकांच्या जोरदार राड्यानं झाली आहे. ज्या विधानभवनात राज्याच्या जनतेसाठी कायदे आणि निर्णय घेतले जातात त्याच विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा झाला.
विधान भवनाच्या पायऱ्यांवर राडा झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. सुरुवातीला महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार अमोल मिटकरी यांनी केली आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे एकमेकांमध्ये भिडले होते. मिटकरी यांनी सत्ताधारी आमदारांनी धमकावलं असल्याचं देखील म्हटलं आहे. सदर प्रकरणानंतर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले की, सत्ताधाऱ्यांवर विरोधक आक्रमकपणे येत असतील, तर आम्ही उत्तरच द्यायचं नाही का?, अमोल मिटकरी यांचा स्वभाव, त्यांचं वागणं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. विधिमंडळाचं सभागृह हे वैचारिक सभागृह आहे. त्यामुळे अशा पद्धतीची घटना घडणं उचित नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी समजून घ्यायला हवं, असं प्रवीण दरेकरांनी सांगितलं. जे काही करायचं आहे, ते वैचारिक भूमिकेतून सभागृहात मांडायला हवी, असंही प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, विरोधक आमदार विधानसभेच्या पायऱ्यांवर येण्याआधीच शिंदे गटातील आमदारांनी त्याठिकाणी येऊन विरोधकांविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर विरोधी पक्षातील आमदार विधानसभेच्या पायऱ्यांजवळ येताच त्यांनीही सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही गटातील आमदारांमध्ये शाब्दीक बाचाबाजी झाली. पुढे याचं रुपांतर धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यातही झालं.
अरे हट्ट...त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही- आमदार भरत गोगावले
सदर प्रकरणानंतर शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमच्यावर विरोधक आरोप करत होते. आता आम्ही त्यांच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवण्यासाठी पायऱ्यावर आंदोलन केलं. आम्ही कुणाला पाय लावत नाही. आम्हाला कुणी पाय लावत असेल तर आम्ही सोडणार नाही. मात्र कुणी अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ, असा इशारा भरत गोगावले यांनी दिला. महाविकास आघाडीच्या आमदारांनी गेल्या काही दिवसांपासून विधीमंडळाच्या पाऱ्यांवर रोज आंदोलन केले. आम्ही आज केले, असं गोगावले म्हणाले.
आम्ही १७० आहोत, ते ९९-१००. आम्ही सगळेच आलो असतो तर काय झाले असतं, असा सवाल भरत गोगावले यांनी उपस्थित केला. तसेच आमच्या मार्गात आलं तर आम्ही सोडणार नाही, असं ते म्हणाले. माध्यमांनी तुम्हाला विरोधकांनी धक्काबुक्की केली, असा प्रश्न विचारताच अरे हट्ट...त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही केली, आम्ही त्यांना धक्काबुक्की केली, असंही गोगावले म्हणाले. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही घाबरणारे नाही, असंही भरत गोगावले यांनी स्पष्ट केलं.