मुंबई: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. मंगळवारी मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझा सांगती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात आज घोषणा केली. मात्र सार्वजनिक जीवनात आपण कार्यरत राहणार असल्याची माहिती शरद पवारांनी दिली.
शरद पवारांच्या या निर्णयानंतर पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ असून राज्यातील काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासह ठाण्यातील राष्ट्रवादीच्य पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी राजीनामे दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पक्षाचे प्रतोद अनिल पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. अनिल पाटील यांनी शरद पवार यांना राजीनामा पत्र पाठवलं आहे. आपण घेतलेला निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा मला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपुर्द करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती अनिल पाटील यांनी केली आहे. मात्र शरद पवार यांनी काही करून राजीनामा मागे घ्यावा, असं आवाहन केलं आहे.
राज्यातील अनेक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. राज्यातून अनेकांचे फोन येऊ लागले. काही पदाधिकारी, नेते मुंबईला येऊन शरद पवारांना भेटण्यासाठी रवाना झाले. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा आग्रह लक्षात घेता, आपल्या निर्णयाबाबत विचार करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा अवधी द्यावा, असा निरोप शरद पवारांनी आंदोलन करणारे कार्यकर्ते- पदाधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे शरद पवार आपला निर्णय मागे घेणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पक्षाध्यक्षपद सोडण्यावर शरद पवार ठाम राहिले तर काय पर्याय असू शकतात याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव आघाडीवर आहे. राज्यसभा सदस्य असलेले आणि शरद पवार यांच्याशी अत्यंत निकटचे संबंध असलेले प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची ही चर्चा आहे. याशिवाय सुनील तटकरे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.
शरद पवार, राजीनामा अन् चर्चांना उधाण-
अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन शरद पवार यांना नेमकी कोणती खेळी केली, याविषयी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहे. वयाच्या ८३व्या वर्षीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला पर्याय नाही, हे शरद पवार यांनी दाखवून देण्यासाठीच त्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसण्याची धूर्त खेळी खेळल्याचे मानले जात आहे.