मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास एक तास जाधव यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली आहे. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच ही भेट असल्याची चर्चा आहे. तसेच, लवकरच भास्कर जाधव हेही शिवसेनेत प्रवेश करतील, अशी सुत्रांची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत मोठ्य प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. त्याचाच, भाग म्हणून विजयी होऊ शकणाऱ्यांना शिवबंधन बांधण्याचे काम वेगात आले असून येत्या आठवड्यात बार्शीचे राष्ट्रवादीचे आ. दिलीप सोपल आणि बोईसरचे बहुजन विकास आघाडीचे आ. विलास तरे यांना शिवबंधन बांधण्याचे निश्चित झाले आहे. तर राष्ट्रवादीचे आणखी दोन आमदारही सेनेच्या वाटेवर आहेत. राष्ट्रवादीचे आणखी दोन आमदार कोणते, त्यांची नावे अद्याप पुढे आली नाहीत. मात्र, राष्ट्रवादीचे कोकणातील नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरेंच्या भेटीमुळे भास्कर जाधव हेही शिवबंधन हाती घेतील, अशी चर्चा रंगली आहे.
भास्कर जाधव यांची ही भेट गुप्त ठेवण्यात आली होती. मात्र, जाधव मातोश्रीतून बाहेर पडत असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे हे मातोश्रीवर येत होते. त्यावेळी त्यांचे एकमेकांशी हस्तांदोलनही झाले. विलास तरे शिवसेनेत येत असल्याबद्दल भास्कर जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केल्याचे सूत्रांनी सांगितले. जाधव यांनी याचा इन्कार केला असला तरी मातोश्रीवर असणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी जाधव मातोश्रीवर येऊन गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जाधव हे कोकणातील नेते असून त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसू शकतो.
भाजपा आणि शिवसेना युती करण्यास इच्छुक आहेत. तरीही, दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. विशेष म्हणज, येणाऱ्या नेत्यांपैकी राष्ट्रवादी आणि काँग्रसचे नेतेच मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे एकापाठोपाठ एक करत राष्ट्रवादीचे मावळे शिवसेनेत दाखल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनीही, उडाले ते कावळे आणि राहतील ते मावळे, असे म्हणत पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर टीका केली होती. दरम्यान, भास्कर जाधव हे कोकणातील वजनदार नेते असून रत्नागिरीतील राष्ट्रवादीचा मोठा चेहरा आहे. मात्र, भास्कर जाधवही आता शिवबंधन बांधणार असल्याचं समजते.