मुंबई: राज्यात महाविकासआघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि शपथविधी लवकरच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 13 मंत्री शपथ घेणार असून काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या आमदारांनी प्रयत्न सुरु केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे धनंजय मुंडे यांची मंत्रिपदाची संधी हुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील निवास्थानी भेट देऊन आपण मंत्री झाल्यावर भवनगडावरील भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यापूर्वीच मंत्रिपदाची शपथ घेतल्याने धनंजय मुंडे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यात येऊ शकते. तसेच याआधी धनंजय मुंडे यांनी विरोधीपक्ष नेत्याची भूमिका निभावली होती. त्याचप्रमाणे आक्रमक भाषणाने सभा गाजवणारे, चांगले नेतृत्वगुण असल्याने प्रदेशाध्यक्षपदी धनंजय मुंडे यांच्या नावाला पसंती असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांची महाविकाआघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिपद भूषविण्याची संधी हुकण्याची शक्यत वर्तविण्यात येत आहे.
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस ठाकरे मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकूण 7 मंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे. तसेच राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत अशा सात मंत्र्यांनी 28 नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. शपथविधीच्या दोन आठवड्यानंतर 12 डिसेंबरला तात्पुरते खातेवाटप करण्यात आले होते.