मुंबई : राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वेगळी भूमिका काही आमदारांनासोबत घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येअजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. आता दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा केला जात आहे. दरम्यान, विधीमंडळात सादर केलेल्या उत्तरात राष्ट्रवादी पक्ष मूळ आमचाच असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील उभ्या फूटीनंतर पक्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करू नये, अशी याचिका अजित पवार यांच्या गटाने विधीमंडळात दाखल केली आहे. या याचिकेनंतर या संदर्भात आप-आपले म्हणणे मांडण्यासाठी विधीमंडळाने शरद पवार गट तसेच अजित पवार गटातील आमदारांना नोटीस बजावली होती. यावर अजित पवार गटाच्या वतीने उत्तर देण्यात आले आहे. अजित पवार गटाच्यावतीने या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाठवलेल्या नोटीसीला अजित पवार गटाकून विधिमंडळात २६० पानी उत्तर सादर केलं आहे.
याचबरोबर, उत्तरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळ आमचाच आहे, असा दावा करण्यात आला आहे. अजित पवार गटाने दिलेल्या उत्तरात आमचा गट हाच मूळ राष्ट्रवादी आहे, कारण पक्षाचे विधानसभेचे प्रतोद अनिल पाटील हे आमच्या बाजूने आहेत. तसेच आमदारांची संख्या देखील आमच्याकडे जास्त आहे. त्यामुळे मूळ राष्ट्रवादी ही आमची आहे. त्यामुळे यासंदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा, अशी भूमिका अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर केली आहे.
शरद पवार गटाच्या आमदारांचं नोटीसला १० पानी उत्तरदुसरीकडे, विधीमंडळाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या आमदारांना नोटीस पाठवण्यात आली होती. आमदार अपात्रतेच्या प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली होती. याप्रकरणी शरद पवार गटाच्या आठ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटिसीला आता उत्तर देण्यात आले आहे. विधिमंडळाच्या नोटिसीला शरद पवार गटाच्या प्रत्येक आमदाराने विधानसभा अध्यक्षांकडे १० पानी उत्तर सादर केले आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.