Join us

हसन मुश्रीफांच्या मुलांची न्यायालयात धाव, अटकेच्या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 11:30 AM

सोमय्यांचे आरोप फेटाळले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलांनी कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेच्या भीतीने विशेष पीएमएलए न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.आपल्याविरोधात किंवा वडिलांविरोधात कोणताही गुन्हा दाखल नसतानाही ईडीने तपास सुरू केला आहे. याप्रकरणी ईडी आम्हाला अटक करेल, अशी भीती आहे आणि यामागे आमच्या वडिलांना लक्ष्य करण्याचा ईडीचा हेतू आहे, असे हसन मुश्रीफ यांची मुले नावीद, आबीद आणि साजीद यांनी अटकपूर्व जामीन अर्जात म्हटले आहे. विशेष न्यायालयाने ईडीला मुश्रीफांच्या मुलांच्या अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश देत सुनावणी १६ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.ईडीने ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर छापा टाकला आणि तेथील कर्मचाऱ्यांना वडिलांविरोधात जबाब देण्यास भाग पाडले. छापा टाकण्याचा आणि तथाकथित तपासाचा उद्देश सत्य बाहेर काढण्याचा नव्हता किंवा संभाव्य गुन्ह्याचे कोणतेही पुरावे शोधण्याचा नव्हता. परंतु, बँकेने माजी कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्या इशाऱ्यावरून कर्जे दिली आणि ते व्यवहार संशयास्पद आहेत, असे जबाब कर्मचाऱ्यांकडून नोंदवून घेण्याचा ईडीचा हेतू होता.बँक कर्मचाऱ्यांची छळवणूक करण्यात आली, त्यांचा अपमानही करण्यात आला, तर महिला कर्मचाऱ्यांना मध्यरात्री दोन वाजता कॉल करण्यात आला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी छळवणूक केल्याबाबत बँक कर्मचारी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास तयार आहेत. अधिकाऱ्यांनी त्यांच्या कानशिलात लगावले, शिवीगाळ केली तसेच दोन-तीन तास पायाची बोटे पकडून ओणवे उभेही केले, असेही याचिकेत म्हटले आहे.सोमय्यांचे आरोप फेटाळलेगेल्या महिन्यात, ईडीने मुश्रीफ, त्यांच्या कुटुंबाशी संबंधित संपत्तीवर छापा टाकला. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर मुश्रीफांच्या साखर कारखान्यावरही छापा टाकला. सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनुसार, मुश्रीफ गडहिंग्लज येथील अप्पासाहेब नलवडे साखर कारखान्यात झालेल्या १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारात सहभागी आहेत. मात्र, मुलांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

टॅग्स :मुंबईकोल्हापूरहसन मुश्रीफन्यायालय