मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर बोलताना सत्ताधारी भाजपसह बीआरएसवर टीका केली. "बीआरएस पक्ष ज्या उद्देशाने महाराष्ट्रात येत आहे ते यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. राज्यातील जनता मुर्ख नाही. त्यामुळे त्यांच्या गाड्यांचा असा ताफा आल्याने काही फरक पडणार नाही", असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
बीआरएसबद्दल ते म्हणाले की, बीआरएस पक्षाच्या घोषवाक्यात 'अब की बार किसान सरकार, अब की बार दलित सरकार' असा उल्लेख आहे. मात्र, किसान म्हणजे शेतकरी आणि शेतकरी म्हणजे महाविकास आघाडी. त्यामुळे बीआरएस पक्ष दलित मते कापणार. या वर्गात वेगवेगळे गट असले तरी आता मात्र दलित वस्त्यांमध्ये एकता पाहायला मिळते आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मर्यादित ठेवले होते. मात्र, आजचे सुशिक्षित तरूण संविधान आणि आरक्षण या दोन्हीबाबत डॉ. आंबेडकरांविषयी सकारात्मक भूमिका मांडत आहेत. मंडल आयोगाचा राजकीय स्वीकार करणारा पहिला माणूस ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे मनातील स्वप्न पूर्ण केले ते शरद पवार होते, असा दाखला आव्हाड यांनी दिला.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भाजप प्रदेशाध्यक्ष ओबीसी मुद्द्यावर मत व्यक्त करत आहेत. याला प्रत्युत्तर देताना आव्हाडांनी म्हटले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी प्रेम पाहायचे असेल तर सर्वात उत्तम उदाहरण मी स्वत: आहे. बावनकुळे यांचे भाजपने आयत्या वेळी तिकीट कापले. राष्ट्रवादीत एबी फॉर्म थेट घरी येतो. तुम्हाला साधं तिकीट दिलं नाही. त्यामुळे जातीपातीचे खालच्या दर्जाचे राजकारण कोणी करू नये", असा इशारा त्यांनी दिला.