IND vs AUS Test: "हे जगभरात आपल्या देशाची लाज घालवतायत", शमीसमोर 'जय श्री राम'चे नारे अन् आव्हाड संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 09:56 AM2023-03-12T09:56:35+5:302023-03-12T09:57:18+5:30
सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील अखेरचा कसोटी सामना अहमादाबाद येथे खेळवला जात आहे.
jitendra awhad news । मुंबई : सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील अखेरचा कसोटी सामना अहमदाबाद येथे खेळवला जात आहे. आधी झालेल्या 3 सामन्यांमधील 2 सामन्यांत यजमान भारताने तर एका सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजय मिळवला. त्यामुळे सध्या सुरू असलेला सामना हा निर्णायक ठरणार आहे. चौथा कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचे कांगारूच्या संघासमोर आव्हान आहे, तर हा सामना जिंकून मालिका विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी भारत प्रयत्नशील असेल. मात्र, अहमदाबाद येथे सुरू असलेल्या चौथ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा शेवट एका वादंगाने झाला.
दरम्यान, चौथ्या कसोटीचा दुसरा दिवस संपल्यानंतर भारतीय खेळाडू डग आऊटच्या दिशेने जात असताना काही चाहते मोहम्मद शमीला पाहून मुद्दाम 'जय श्री राम' चे नारे देताना दिसले. यावेळी सूर्यकुमार यादवने मात्र हात जोडून हवेत उंचावले अन् चाहत्यांना उत्तर दिले. या पूर्वी देखील शमी, मोहम्मद सिराज यांनी टीळा न लावल्यावरून त्यांना ट्रोल केले होते, पण त्या व्हिडीओत या दोघांसह भारताच्या अन्य सदस्यांनीही टीळा लावला नव्हता आणि जाणीवपूर्वक त्यांना वगळले गेले होते.
हे जग भरात आपल्या देशाची लाज घालवत आहेत ४० वर्षा पुर्वी मुंबईत No Salim Durrani No Match … अश्या घोषणा मुंबईच्या क्रिकेट रसीकांनी दिल्या होत्या … ते खरे क्रिकेट प्रेमी होते … शमी माफ कर …..एक क्रिकेट प्रेमी देश प्रेमी अजुन काय म्हणू शकतो @MdShami11 pic.twitter.com/iEammsYQhV
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 11, 2023
जितेंद्र आव्हाड संतापले
मात्र, आता या मुद्द्यांवरून राजकारण देखील चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. हे सर्वजण जगभरात आपल्या देशाची लाज घालवत असल्याचे देखील त्यांनी म्हटले. "हे जगभरात आपल्या देशाची लाज घालवत आहेत 40 वर्षा पूर्वी मुंबईत No Salim Durrani No Match … अशा घोषणा मुंबईच्या क्रिकेट रसीकांनी दिल्या होत्या… ते खरे क्रिकेट प्रेमी होते… शमी माफ कर…..एक क्रिकेट प्रेमी देश प्रेमी अजुन काय म्हणू शकतो @MdShami11", अशा शब्दांत आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"