Join us

Aarey Forest: 'पडणारं प्रत्येक झाड त्यांचा एक-एक आमदार पाडणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 10:50 AM

जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेना-भाजपावर हल्लाबोल

मुंबई: आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीविरोधात विरोधक आणि पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. मुंबईकरांनी आरेतील वृक्षतोडीविरोधात आवाज उठवायला हवा. पडणारं प्रत्येक झाड आपला एक आमदार पडेल, याची जाणीव सरकारला व्हायला हवी, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. आरेतलं पडणार प्रत्येक झाड आपला एक आमदार पडणार याची जाणीव झाल्यावर सरकारची झाडं पाडण्याची हिंमत होणार नाही, असं आव्हाड म्हणाले. ट्विटरवरुन व्हिडीओच्या माध्यमातून संवाद साधणाऱ्या आव्हाडांनी शिवसेना, भाजपावर जोरदार टीका केली. 'एकानं सांगितलं होतं आम्ही आरे पाडणार. दुसऱ्यानं म्हटलं होतं आरे पाडू देणार नाही. मात्र या दोघांनी मुंबईकरांना फसवलं. दोघंही काल एक झाले आणि आरेचं कारे, कारेचं आरे झालं. आता आदेश आलाय तोडा रे. मात्र आता यावर कोणीच बोलत नाही,' अशा शब्दांत आव्हाड यांनी परस्परविरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेना, भाजपाला लक्ष्य केलं.  काही दिवसांपूर्वी सगळीकडे आरे-आरे सुरू होतं. मात्र आता सगळीकडे झोपा रे सुरू झालंय, असा टोला आव्हाडांनी लगावला. 'झाडं कापली जाणार म्हणून आधी काही जणांकडून कारे सुरू होतं. आरेला कारेनं उत्तर दिलं जातं. मात्र काल संध्याकाळपासून आरेत वृक्षतोड सुरू झाली. आता झाड्यांना मिठ्या मारणारे, एकही झाड तोडू देणार नाही म्हणणारे कुठे गेले,' असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेल्या याचिका काल मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावल्या. यानंतर काल संध्याकाळपासून आरेमधील वृक्षतोडीस सुरुवात करण्यात आली. संध्याकाळी इलेक्ट्रिक कटरच्या आणि करवतींच्या सहाय्यानं झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आल्यानंतर मोठा आवाज निर्माण झाल्यानं स्थानिकांना घटनास्थळी धाव घेतली. ही माहिती वेगानं पसरल्यानं पर्यावरणप्रेमींनी आरेमध्ये धाव घेत वृक्षतोड थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झाले. यावेळी पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोपही पर्यावरणप्रेमींनी केला. न्यायालयानं निर्णय दिल्यानंतर मेट्रो प्रशासनानं तातडीनं वृक्षतोड करण्यास सुरुवात केल्यानं पर्यावरणप्रेमींचा संताप अनावर झाला आहे.  

टॅग्स :आरेमेट्रोजितेंद्र आव्हाडशिवसेनाभाजपा