मुंबई : धनगर आरक्षण दिल्याशिवाय मंत्रालयात पाऊल ठेवणार नाही, असे जाहीर वक्तव्य करणाऱ्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य रामराव वडकुते यांनी मंगळवारी मंत्रालयाच्या दारातच अडविले. आरक्षण दिल्याखेरीज तुम्हाला आत जाता येणार नाही, अशी भूमिका वडकुते यांनी घेतल्याने दोघांमध्ये काही क्षण शाब्दिक वाद झाला.
नांदेडमधील माळेगाव येथील खंडोबारायांच्या यात्रा मेळाव्यात बोलताना, आपण धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर मंत्रालयात जाणार नाही, असे जाहीर केले होते. त्याचे काय झाले, असा सवाल वडकुते यांनी केला. यावर माझे भाषण नीट ऐका, माध्यमांत काय दाखवले व काय छापून आले ते पाहू नका. मी तसे म्हटले नव्हते. धनगर समाजाला आरक्षण दिले नाही, तर आम्ही मंत्रालयात जाऊ शकणार नाही असे मी म्हणाले होते, असे पंकजा यांनी सांगितले.