Join us

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची नाराजी दूर, वरिष्ठ नेत्यांकडून यशस्वी मनधरणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 4:37 PM

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोळंके यांची यशस्वी मनधरणी केली. 

मुंबई -  मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकास सोळंके यांची नाराजी दूर करण्यात अखेर पक्षाला यश आले आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होऊन प्रकाश सोळंके यांनी राजीनाम्याची तयारी केली होती. मात्र आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोळंके यांची यशस्वी मनधरणी केली. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रकाश सोळंके यांची नाराजी दूर करण्यासाठी पुढाकार घेतला होता. तसेच धनंजय मुंडे यांनीही त्यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न केले होते. दरम्यान जयंत पाटील आणि अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर प्रकाश सोळंके म्हणाले की, ''चार वेळा आमदार राहिल्याने यावेळी मला मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने माझ्या मनात काहीशी नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणारणातून निवृत्त व्हावे या निर्णयापर्यंत मी आलो होतो.  मात्र  कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले असता त्यांनी कुठलाही निर्णय घाईगडबडीने घेऊ नका, असा कल दिला. दरम्यान, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करताना मला पक्षात पूर्वीप्रमाणेच मानाने काम करता यावे अशी अपेक्षा मी व्यक्त केली. पवार साहेबांशीही चर्चा झाली. त्यामुळे आता मी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला आहे,'' असे सोळंके यांनी सांगितले. 

एक टर्म वगळता सलग चार वेळा माजलगावचे आमदार राहिलेले प्रकाश सोळंके यांनी सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात  स्थान न मिळाल्याने मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. . स्वत: सोळंके यांनीच सोमवारी ही माहिती दिली होती. दरम्यान, आमदार  सोळंके यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे ९  सदस्य, पंचायत समितीचे ३ सभापती व बाजार समितीचे सभापती अशोक डक हे सुद्धा असल्याचा दावा करण्यात आला होता.  महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात प्रकाश सोळंके यांचे नाव पक्के असल्याचे बोलले जात होते. सोळंके यांचे पवार काका- पुतण्या दोघांशी असलेले संबंध व त्यांची पक्षावरील निष्ठा आणि पाठीशी असलेला अनुभव पाहता किमान राज्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडेल अशी अपेक्षा त्यांना होती. कार्यकर्त्यांमध्येही उत्साह वाढला होता. मात्र सोमवारी  झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रकाश सोळंके यांना स्थान न मिळाल्याने मतदार संघात निराशेचे वातावरण पसरले होते.  

टॅग्स :प्रकाश सोळंकेराष्ट्रवादी काँग्रेसमाजलगांवबीडराजकारण