रोहित पवार एक दिवस मतदारसंघात येतात अन् १०-१५ फोटो काढून जातात- राम शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 02:23 PM2021-07-12T14:23:46+5:302021-07-12T14:24:16+5:30

राम शिंदे यांनी खेडकर यांच्या कामाचं कौतूक करताना रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.

NCP MLA Rohit Pawar comes to the constituency one day and takes 10-15 photos; Said BJP Leader Ram Shinde | रोहित पवार एक दिवस मतदारसंघात येतात अन् १०-१५ फोटो काढून जातात- राम शिंदे

रोहित पवार एक दिवस मतदारसंघात येतात अन् १०-१५ फोटो काढून जातात- राम शिंदे

googlenewsNext

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार एक दिवस मतदारसंघात येतात आणि 10-15 फोटो काढून जातात. त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करुन रोज कार्यक्रम घेत असल्याचं दाखवतात, असा आरोप भाजपाचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे. कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य सुनीता खेडकर यांच्या पुढाकारातून झालेल्या विविध कामांचे उद्घाटन राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी राम शिंदे यांनी खेडकर यांच्या कामाचं कौतूक करताना रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.

राम शिंदे म्हणाले की, रोहित पवार यांना मी मतदारसंघातील कामांबद्दल अनेक प्रश्न विचारले. मात्र, आमदार रोहित पवार यांच्याकडून त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. माझ्या प्रश्नांना उत्तरे द्यायला ते घाबरतात काय? आमदार रोहित पवार एक दिवस येतात, दहा-पंधरा फोटो काढून जातात. नंतर सोशल मीडियात पोस्ट करून रोज कार्यक्रम घेत असल्याचे दाखवितात, असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. मतदारसंघाचा विकास फक्त फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावर दिसतो. प्रत्यक्षात मात्र दिसत नाही, अशी टीकाही राम शिंदे यांनी केली आहे.

तसेच जलयुक्त शिवार कामाची चौकशी कर्जत तालुक्यातच जास्त सुरू आहे. पण कितीही चौकशी करा, यातून काहीच निष्पन्न होणार नाही, असं विधानही राम शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळे राम शिंदे यांच्या या आरोपावर रोहित पवार काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मागील सरकारच्या काळात झालेल्या जलसंधारणाच्या कामांची चौकशी सुरू आहे. मात्र, ही चौकशी जास्त प्रमाणात आपल्या कर्जत तालुक्यातच करण्यात येत आहे. ती कोणामुळे आणि कशासाठी केली जात आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, यामध्ये काहीही आढळून येणार नाही. त्यावेळी जलसंधारणाची सर्व कामे जनतेच्या हितासाठीच झाली होती. गावात सुरू असलेले पाण्याचे टँकर बंद झाले, पाणी उपलब्ध झाल्याने पिके चांगली आली. हाच ही कामं योग्य पद्धतीने झाल्याचा पुरावा आहे. त्यामुळे माझे आव्हान आहे की चौकशी कराच, असं आव्हान देखील राम शिंदे यांनी दिलं आहे. 

Web Title: NCP MLA Rohit Pawar comes to the constituency one day and takes 10-15 photos; Said BJP Leader Ram Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.