PM Narendra Modi in Mumbai: "पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले, म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागणार"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 12:47 PM2023-01-19T12:47:10+5:302023-01-19T12:51:32+5:30
PM Narendra Modi in Mumbai: राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते ३८ हजार ८०० कोटींच्या विकासकामांचं लोकापर्ण आणि काही कामांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्तानं, काही वर्षांपासून रखडलेल्या आणि मुंबईसाठी महत्वाच्या असणाऱ्या प्रकल्पांना गती देण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न आहे.
नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावर विरोधकांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. याचदरम्यान राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले म्हणजे मुंबई पालिकेची निवडणूक लागणार, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच इतर प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यात जाण्यापेक्षा आणि आपल्या राज्यात कसे येतील यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांशी चर्चा करावी, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीनं आणि भाजप-शिंदे गटाकडून मोदींच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोदींच्या हस्ते बीकेसी मैदानात मुंबईतील विविध विकासकामांचं भूमिपूजनही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी बीकेसी मैदानात तीन व्यासपीठं उभारण्यात आली आहेत. त्यात मुख्य स्टेजवर पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नेते असतील. दुसऱ्या स्टेजवर अवधूत गुप्ते यांच्या संगीताचा कार्यक्रम होईल. तर तिसऱ्या स्टेजवर भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा ९०० अधिकाऱ्यांसह साडेचार हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. तसेच, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवले जाणार आहे. सायबर पोलिस सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे, मुंबई पोलिसांच्या दिमतीला बॉम्बशोधक व नाशक पथक, राज्य दहशतवादविरोधी पथक, जलद प्रतिसाद पथकासह, राज्य राखीव बल विविध यंत्रणा तैनात असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा-
(गुरुवार, दि. १९ जानेवारी २०२३)
दुपारी ४.४० : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आगमनप्रसंगी उपस्थिती, मुंबई विमानतळ.
सायं. ५ : मुंबईतील विविध प्रकल्पांचे लोकार्पण/भूमिपूजन/लाभ वितरण व सभा, बीकेसी, मुंबई.
सायं. ६.३० : मुंबई मेट्रो मार्गिका 2 अ आणि 7 चे लोकार्पण, गुंदवली मेट्रो स्टेशन, अंधेरी, मुंबई.
सायं. ७.२० : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रयाणप्रसंगी उपस्थिती, मुंबई विमानतळ.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"