अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात होती. त्यासाठी युवासेनेच्या वतीनं आदित्य ठाकरेंनी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयानं परीक्षा घेण्याचे आदेश दिल्यानं युवासेनेला धक्का बसला आहे. यावरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारला टोला लगावला होता. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले.
'कुलपती म्हणून राज्यपालांना, कुलगुरूंना विश्वासात घेतले नाही. शिक्षण तज्ञांची मते धुडकावली. युजीसीला जुमानले नाही. मंत्री मंडळात चर्चा केली नाही. विद्यार्थ्यांना अखेरपर्यंत वेठीस धरले. अहंकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले. काय साध्य केले?,' असा सवाल शेलारांनी ट्विट करून विचारला. 'एका "बबड्याच्या" हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला,' असा टोला शेलार यांनी लगावला होता.
त्याला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी ट्विट केलं की,'' आमची परिक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती व राहील. पण आशीष शेलारजी बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही हे पटलं असतं.आता त्यासाठी किमान आपल्या tweet खालील रिप्लाय तरी वाचाल.''