मुंबई: शिवेंद्र राजे हे भाजपामध्ये जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्र राजे यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. शहराच्या विकासासाठी भाजपात प्रवेश करण्याच्या आमदार शिवेंद्रराजे यांच्या भूमिकेला प्रमुख पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक यांनी पाठिंबा दर्शविला आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीकडून निवडून येण्याचे दिवस आता गेले, असं ते म्हणाले आहेत. शिवेंद्र राजेंबरोबर 22 जिल्हा परिषद सदस्य आणि 9 जिल्हा बँकेचे संचालक भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आमदार शिवेंद्रराजे यांनी नगर विकास आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डासह आजी माजी नगरसेवकांची तातडीची बैठक काल बोलावली होती. या बैठकीत मतदान वाढविण्याबाबत प्राथमिक बोलणी झाल्यानंतर आ. भोसले यांनी उपस्थितांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क झाल्याचे सांगून पक्षांतर करण्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, कोणावरही रुसून, रागावून किंवा वाद आहेत म्हणून पक्ष सोडण्याचा विचार नाही. गेल्या पाच वर्षांत सत्तेपासून लांब राहिल्यामुळे अनेक विकासकामांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. विकासकामांसाठी निधी उपलब्ध होण्याबरोबरच अनेक अडचणी येतात. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजपासोबत राहणं हिताचं आहे. या बैठकीला पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अॅड. दिलावर मुल्ला, निळकंठ पालेकर, प्रकाश गवळी, व्यंकटराव मोरे, यांच्यासह आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.
''राष्ट्रवादीकडून निवडून येण्याचे दिवस गेले''; शिवेंद्र राजेंनी दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 12:37 PM