विद्या चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा; भाजपची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 09:25 PM2020-03-03T21:25:19+5:302020-03-03T21:35:02+5:30
भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष माधवी नाईक यांची मागणी
मुंबई - सुनेचा छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्ष माधवी नाईक यांनी आज केली.
आ.विद्या चव्हाण यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गंभीर गुन्हाची दखल घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी भाजपा महिला मोर्चातर्फे आज मुंबईत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा सरचिटणीस अर्चना देहनकर, भारती दिगडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष शलाखा साळवी, प्रदेश मंत्री निलम गोंधळी, निलम मोकाक्षी, स्वाती जाधव, मुंबई महानगरपालिका उपनेता रिता मखवाना, नगरसेविका सपना म्हात्रे, राजश्री शिरवाडकर, विना देशमुख सह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांसह कुटुंबीयांविरोधात FIR दाखल
यावेळी माधवी नाईक म्हणाल्या की, महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या विद्या चव्हाण यांचा खरा चेहरा आज सगळ्यांसमोर आलेला आहे. सुनेने गुन्हा दाखल केल्यानंतर सुने विरोधातच आक्षेपार्ह विधान करणेही निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी घटनेची दखल घेऊन कठोर कारवाई करावी. चव्हाण यांच्या वर्तनामुळे विधिमंडळाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. त्यामुळे विद्या चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. भाजपा महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या पीडित सुनेच्या पाठिशी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.