राष्ट्रवादी आमदारांना लोकसभेत देणार बढती, आमदारांना मात्र विधानसभेचीच ओढ
By दीपक भातुसे | Published: June 1, 2023 10:16 AM2023-06-01T10:16:32+5:302023-06-01T10:16:47+5:30
अनेक आमदार लोकसभेची निवडणूक लढवायला तयार नाहीत.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीतजास्त जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादीने तयारी सुरू केली असून, अनेक वर्षे आमदार असलेल्यांना लोकसभा निवडणुकीत उतरविण्याची चाचपणी राष्ट्रवादीने सुरू केली आहे. मात्र, अनेक आमदार लोकसभेची निवडणूक लढवायला तयार नाहीत. राज्यात महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण आहे. त्यामुळे विधानसभेत महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल आणि राज्यात सत्ता येईल, अशी आशा असल्याने अनेक आमदार लोकसभा लढविण्यास तयार नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत पक्षाची दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीने २०१९ साली लढविलेल्या २२ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. लोकसभेच्या ज्या संभाव्य जागा राष्ट्रवादी लढविणार आहे, त्या मतदारसंघांत अपेक्षित उमेदवाराबाबत पक्ष सर्व्हे करणार आहे. या सर्व्हेत ज्या उमेदवाराला जास्त पसंती मिळेल, त्याला उमेदवारी देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला मागील लढविलेल्या जागा मिळाव्यात, अशी भूमिका काहींनी मांडली. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने लढविलेल्या जागांपैकी ज्या ठिकाणी ठाकरे गटाचा खासदार आहे त्या जागा सोडण्याची वेळ आली तर तयारी ठेवावी लागेल, हे पवारांनी या बैठकीत सांगितल्याचे समजते.
लोकसभा नको, विधानसभा हवी
गुलाबराव देवकर यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, यावेळी देवकर यांनी जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते. आमदार अनिल पाटील यांचे नाव जळगाव लोकसभेसाठी पुढे आले तेव्हा त्यांनीही विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी हसन मुश्रीफ यांचे नाव बैठकीत पुढे आले. पण, त्यांनीही नकार देत विधानसभा निवडणूक लढविण्याचीच इच्छा व्यक्त केली. दोन दिवसांच्या बैठकीत अनेक आमदारांची नावे लोकसभेसाठी चर्चेत आली. परंतु, त्या सर्वांनी त्याबाबत अनुत्सुकता दाखविल्याचे समजते.