सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांसह कुटुंबीयांविरोधात FIR दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 01:49 AM2020-03-03T01:49:41+5:302020-03-03T07:06:09+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेतील आमदार विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबातील इतर चार सदस्यांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेतील आमदार विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबातील इतर चार सदस्यांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. राज्यातील विधान परिषद सदस्या विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित (पीडितेचा पती), मुलगा आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल चव्हाण (आनंदची पत्नी) यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या महिला नेत्या असलेल्या विद्या चव्हाणांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
विलेपार्ले पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेतला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या सर्व प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच विद्या चव्हाण यांनी आपल्यासह कुटुंबीयांविरोधात करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सुनेनं 16 जानेवारीला तक्रार दिली होती. पोलिसांनी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आणि इतर सदस्यांविरोधात कलम 498 ए, 354, 323, 504, 506 आणि 34 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.
NCP leader Vidya Chavan and her family has been booked, in a case under the sections 498A, 354, 323, 504, 506 and 34 IPC, for alleged harassment of her daughter-in-law
— ANI (@ANI) March 2, 2020
गेल्या अनेक दिवसांपासून विद्या चव्हाणांसह कुटुंबीय सुनेचा छळ करत असल्याची माहिती आता समोर आली आहे. पीडितेला पहिली मुलगी आहे. त्यानंतर दुसरीसुद्धा मुलगीच झाल्यानंच विद्या चव्हाण कुटुंबीय पीडितेचा छळ करत होते. पीडित मुलीने विद्या चव्हाण यांच्या घरी ठेवलेल्या तिच्या मौल्यवान वस्तूंचीही मागणी केली आहे. विशेष म्हणजे महिलांवर अन्याय झाल्यावर तत्परतेने पुढे येणाऱ्या विद्या चव्हाण याच सुनेचा छळ करत असल्याचं समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.