मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022) संसदेत सादर केला. सीतारामन यांनी देशातील पायाभूत सुविधांसाठी यावेळी मोठ्या घोषणा केल्या. यंदाच्या अर्थसंकल्पात २०४७ पर्यंतची रुपरेषा असल्याचं सांगत 'पीएम गतिशक्ती योजने'च्या 'मास्टर प्लान'वर सरकार काम करत असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. मात्र अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील नेत्यांनीही अर्थसंकल्पावर टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील अर्थसंकल्पावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. २०२२-२३चा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे "खोदा पहाड और चूहा भी नहीं निकला", असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच आज सादर झालेला अर्थसंकल्प म्हणजे फक्त शब्दांचा बुडबुडा असाच होता. सर्वसामान्यांसाठी कुठला दिलासा मिळालेला नाही. एकंदरीतच संपूर्ण निराशाजनक असा अर्थसंकल्प सादर झाला, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पातून काही क्षेत्रांना दिलासा देण्यात आला आहे. तर काही क्षेत्रांची निराशा झाली आहे. अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, करदात्यांची निराशा झाली आहे. इनकम टॅक्स स्लॅबमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सलग सहाव्या वर्षी आयकरात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसल्याने नाराजी वर्तविण्यात येत आहे.
महिलांसाठी 'मिशन शक्ती'सह ४ महत्वाच्या घोषणा-
केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पात महिला आणि बालकल्याणसाठी एक योजना आणली आहे. महिला सक्षमीकरणासाठी मिशन शक्ती आणि सक्षम अंगणवाडी योजना, निर्मला सीतारामन यांनी जाहीर केली आहे. आमच्या सरकारने महिला आणि बालकल्याण विभागासाठी मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० सारख्या योजना तयार केली आहे. ज्यामुळे महिलांना याचा लाभ मिळू शकेल, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. तसेच २ लाख अंगणवाड्या अद्ययावत करणार असल्याचेही निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितलं.