Join us

'स्वतःला अभिनेत्री म्हणवणाऱ्यांनी अभ्यास करावा'; अमोल कोल्हे संतापले, केतकीचा केला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 3:13 PM

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील केतकीच्या पोस्टनंतर निषेध व्यक्त केला आहे. 

मुंबई- अभिनेत्री केतकी चितळेनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राज्यात मोठा वाद सुरू झाला आहे. केतकीच्या पोस्टवरुन सर्वस्तरातून तिच्यावर जोरदार टीका होत आहे. 

केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टनंतर राज्यात दोन ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केतकी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून तिचा समाचार घेतला जात आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील केतकीच्या पोस्टनंतर निषेध व्यक्त केला आहे. 

शरद पवार यांच्याबद्दल द्वेषाने गरळ ओकणाऱ्यांचा जाहीर निषेध...महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या जडणघडणीत कृषी, सहकार, उद्योग, सामाजिक समतोल, महिला धोरण अशा अनेक क्षेत्रांत आदरणीय शरद पवारांचे मोलाचं योगदान आहे, असं अमोल कोल्हे ट्विटरद्वारे म्हणाले. तसेच विखारी आकसापोटी अशी गरळ ओकण्याआधी शरद पवारांनी महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याचा स्वतःला अभिनेत्री म्हणवणाऱ्यांनी अभ्यास करावा, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेत्री केतकी चितळेवर टीका केली आहे. केतकी इतकी विकृत असेल असे वाटले नव्हते. तिने काय लिहिले आहे हे जरा वाचा आणि तुमच्या आजोबां बद्दल वडिलांबद्दल असा कोणी लिहिलं तर काय वाटेल याचाही विचार करा असे आवाहनही आव्हाड यांनी केले आहे. 

चोप दिल्यानंतरच मनाला शांती मिळेल- रुपाली पाटील

मला वाटतं ती मानसिक रुग्ण आहे. आपलं वय काय आणि आपण बोलतो काय याचा जरा विचार करायला हवा. तिनं ज्या पद्धतीनं पोस्ट केली आहे. त्याच पद्धतीनं तिला प्रतिक्रिया देखील मिळत आहेत. मला वाटतं तिला आता चोप देण्याची वेळ आली आहे. कारण तिच्यावर संस्कार काही व्यवस्थित झालेले दिसत नाहीत. त्यामुळे छडी लागे छमछम विद्या येई घमघम असं म्हणतात. त्यामुळे छडीनं चोप देणं गरजेचं आहे, असं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील म्हणाल्या.

टॅग्स :डॉ अमोल कोल्हेकेतकी चितळेशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस