Join us

Maharashtra Political Crisis: “देवेंद्र फडणवीस सुपर सीएम झालेत का? एकनाथ शिंदे त्यांनाच विचारुन सगळे निर्णय घेतायत”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 1:05 PM

Maharashtra Political Crisis: ज्या दिवशी त्यांच्या समोरुन माईक काढून घेतला, त्यादिवशीच ते लक्षात आले होते, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला होता.

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कॅबिनेटमध्ये अनेक निर्णय घेतले. तत्पूर्वी नवे सरकार स्थापन झाल्यापासून काही निर्णयाला स्थगिती दिली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात येत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. 

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना, आताचे सगळे निर्णय पाहिले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारुन सगळे निर्णय घेतायत. सुपर सीएम झालेत का ते? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना, हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारु शकता. ज्या दिवशी त्यांच्या समोरुन माईक काढून घेतला, त्यादिवशीच ते लक्षात आले होते, त्यांना (शिंदे यांना) चालत असेल ते, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. 

बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक खूप स्वाभिमानी होते

मला हे कौतुक वाटतंय, कारण बाळासाहेब ठाकरेंचे जे शिवसैनिक खूप स्वाभिमानी होते. काय नवीन बदल झालाय मला काही समजेना, अशी मिश्लिक टिपण्णी सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदेंकडून वारंवार बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्यावरून करण्यात आली. तत्पूर्वी, एका कार्यक्रमाला संबोधित करताना, खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्र दौरा काढला तर राज्यात मोठा बदल होऊ शकतो. त्यामुळे २०२४ मध्ये राष्ट्रवादी हा एक नंबरचा पक्ष होईल, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, निवडणूका असो नसो आपल्या पक्षाच्या बैठका या होतच असतात. विरोधी पक्षात असताना लोकांनी पवारसाहेबांना जास्त प्रेम दिले आहे. सत्तेत असतानाही दिले आहे. आता जे काही १०५ असल्याचे बोलत आहेत त्यात आपल्या पक्षातून गेलेले आपले ५० आहेत हे लक्षात ठेवा असे सूचक विधानही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले होते.  

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीससुप्रिया सुळे