मुंबई - राज्याच्या इतिहासात असे अपयशी मुख्यमंत्री आज पर्यंत झालेले नाही. महिला सुरक्षिता, ड्रग्ज, राज्यात वाढलेले गुन्हेगारीचे प्रमाण तथा जालना येथे मराठा समाजाच्या सुरू असलेल्या आंदोलनात गरीब महिला आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेला लाठीचार्ज या सर्व घटनांमुळे राज्यातील मुख्यमंत्री, गृहमंत्री पूर्णपणे अपयशी झाल्याचे यावरून दिसून येत आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
सुप्रिया सुळेंनी आज मुंबईतील बस बेस्ट कामगारांच्या समस्या संदर्भात प्रतिक्षा नगर येथील बस डेपोमध्ये जाऊन कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सर्वच गोष्टींवर राजकारण करण्याची गरज नाही. आपण राजकारण बाजूला ठेवून माणुसकी दाखवायला हवी. राज्य सरकारकडे माणुसकी नसली तरी अजूनही आमच्याकडे माणुसकी शिल्लक आहे. मुंबईने आतापर्यंत आपल्या सर्वांना खूप काही दिलं आहे. या कामगारांना मुख्यमंत्र्यांकडून शब्द देण्यात आला असूनही पगार वाढ करण्यात आलेली नाही आणि दिवाळी बोनस देखील अद्याप देण्यात आलेला नाही. महागाई प्रचंड वाढली असताना या सामान्य कामगारांच्या हातात १२ ते १३ हजार रुपये पडतात. गरीब सामान्य माणूस महागाईमध्ये प्रचंड प्रमाणात भरडला जात आहे. याची जाणीव या सरकारला नाही आहे असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत कामगारांना त्यांचा मोबदला न मिळाल्यास मी स्वतः आंदोलनाला बसणार आहे. बेस्टचं एक ऑडिट लवकरात लवकर करायला हवं. या सरकारकडे मेट्रो सारख्या प्रकल्पांसाठी करोडो रुपये आहेत मात्र सामान्य कामगारांना देण्यासाठी पैसे नाहीत. ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. ज्या बाळासाहेबांनी मुंबईत बसून दिल्ली हलवली आज त्यांचं नाव वापरणारे लहान लहान गोष्टींसाठी दिल्लीत पळत आहेत. यांच्याबद्दल माझ्याकडे शब्द नाहीत अशी टीकाही सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली.
भाजपा म्हणजे भारतीय जुमला पार्टी
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक वेळा मराठा आरक्षणाविषयी संसदेत प्रश्न मांडला आहे. आम्ही सातत्याने संसदेत बोललो आहेत. आमची लाईन महाराष्ट्रात आणि दिल्लीतही आहे. पण भाजपा म्हणजे भारतीय जुमला पार्टी आहे. महाराष्ट्रात आरक्षणाविषयी एक बोलतात आणि दिल्लीत एक बोलतात. देवेंद्र फडणवीस बारामतीत येऊन म्हणाले होते की, पहिल्या कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षण देऊ. तेव्हा ते सीएम होते. नंतर डीसीएम झाले. आता ते डीएसीएम १ झाले. त्यानंतर आता पन्नास-दोनशे कॅबिनेट झाल्या, पण काही झालं नाही. दिल्लीतील भाजपाच्या लोकसभेच्या सदस्यांनी धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लीम समाजाच्या आरक्षणाला विरोध केला आहे. यामुळे या विषयात भाजपा उघड झाली आहे असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला.