“ज्या पक्षांनी हातमिळवणी केली, भाजपने त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला”; नवाब मलिकांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 01:09 PM2022-01-24T13:09:45+5:302022-01-24T13:10:59+5:30
भाजपसोबत युतीत असताना शिवसेनेची २५ वर्षे सडली. हे खरे आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप नेते अनेकविध मुद्द्यांवरून एकमेकांसमोर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना युतीबाबत भाष्य केले. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, भाजपवर टीका केली आहे. ज्या पक्षांनी हातमिळवणी केली, भाजपने त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.
जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत, त्या काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचे तेज दाखवणार आहे. जसे काळजीवाहू सरकार असते, तसे हे काळजीवाहू विरोधक आहेत. त्यांचा स्वतःच स्वतःच्या काळजीने अंत होणार आहे. त्यामुळे त्यांची चिंता करण्याची गरज नाही. हे काळजीवाहू विरोधक कोणे एकेकाळी आपले मित्र होते. हे नाही म्हटले तरी आपले दुःख आहे. याचे कारण आपण त्यांना पोसले. मी गोरेगावच्या शिबिरात म्हटलो होतो की आपली २५ वर्षे युतीत सडली. तीच माझी भूमिका आणि मत आजही कायम आहे. मी त्या मतावर ठाम आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. यानंतर आता नवाब मलिक यांनी यावर भाष्य केले आहे.
भाजपने त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला
ज्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितले की, भाजपासोबत युतीत असताना शिवसेनेची २५ वर्षे सडली. हे खरे आहे. देशात भाजपने ज्या पक्षासोबत हातमिळवणी केली, त्याला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटते यामुळेच अनेक दिवसांपासून ते काहीतरी वेगळे करण्याच्या विचारात होते आणि २०१९ मधील निवडणुकांचे निकाल पाहून त्यांनी निर्णय घेतला. मला वाटते आता शिवसेनेचा विस्तार होईल, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी आपली खंत व्यक्ती केली ती योग्य आहे. ही एकट्या शिवसेनेची गोष्ट नाही. तर जे चांगल्या हेतूने भाजपासोबत गेलेत त्या सर्व पक्षांचे हेच हाल झाले आहेत. अकाली दल असो, गोव्यात एमजीपी असो किंवा हरियाणा असो, चंद्रबाबू नायडू असो, जयललिता असो सर्वांना त्याची किंमत चुकवावी लागली. मात्र शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे ज्याने त्यांना किंमत चुकवावी लागेल असे काम केले आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.