Join us

“अविवाहित लोकांच्या हातात देश, विवाहाविषयी ते गंभीर नाहीत”; नवाब मलिकांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 8:43 AM

अविवाहित मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांपेक्षा जनतेला काय वाटतंय, हे महत्त्वाचे आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

मुंबई: मुलीच्या विवाहाचे वय १८ वरून २१ वर्षे करण्यासंदर्भात केंद्र सरकार गांभिर्याने विचार करत असून, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या मुद्द्यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा टीका करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून, अविवाहित लोकांच्या हातात हा देश आहे, विवाहाविषयी ते गंभीर नाहीत, अशी खोचक टोला लगावला आहे.  

महिलांचे वय २१ झाले, तर मग पुरुषांचे वय २५ केले जाणार का, असा सवाल करत जो कुणी सज्ञान व्यक्ती आहे, त्याला आपल्या विवाहाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्याच्या परवानगीशिवाय कोणताही विवाह देशात होऊ शकत नाही. असे तर नाही ना, की लोकांनी लग्नच करू नये, या दिशेने मोदी सरकार देशाला घेऊन जायचा प्रयत्न करत आहे का, अशी खोचक विचारणा करत, हा देश अविवाहित लोकांच्या हातात असून, विवाहाविषयी ते गंभीर नाहीत, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.

अविवाहित मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना काय वाटते हे महत्त्वाचे नाही

जनतेला काय हवे, ते महत्त्वाचे आहे. अविवाहित मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना काय वाटते, हे महत्त्वाचे नाही. सज्ञान व्यक्तीला मतदान करण्याचा, पंतप्रधान निवडण्याचा अधिकार आहे, त्याला आपल्या लग्नाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असायला हवा. १८ वर्षांत मतदानाचा अधिकार आहे. १८ वर्षांत व्यक्तीला सज्ञान म्हणून घोषित केले जाते. पती-पत्नीमध्ये वयाचे अंतर असायला हवे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुलींचे लग्नाचे वय १८ वर्षांवरून २१ वर्षे करण्यावर चर्चा झाली. त्यानंतर यासंदर्भातील विधेयक या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडण्याचा निर्णय देखील झाल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात सरकारने नेमलेल्या टास्क फोर्सने मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१ करण्याची शिफारस केली आहे. या अहवालानंतर मंत्रिमंडळात त्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. 

टॅग्स :केंद्र सरकारनवाब मलिकनरेंद्र मोदीभाजपा