मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने भाजप आणि ईडीच्या कारवायांविरोधात टीका करताना दिसत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत ED ने किरीट सोमय्या यांना अधिकृत प्रवक्ता केले आहे का, अशी विचारणा केली आहे.
नवाब मलिकांनी आपल्या घरी ED किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणांची धाड पडणार असल्याचे सूचक ट्विट केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगल्या होत्या. यावर, नवाब मलिकांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी ढापल्या आहेत. हा घोटाळा बाहेर आला आहे. म्हणूनच ते हात-पाय मारत आहेत. त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. नवाब मलिकांनी याला प्रत्युत्तर दिले आहे.
ED ने किरीट सोमय्यांना अधिकृत प्रवक्ता केले आहे का
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेता ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी छापामारी करत असल्याचे सांगत आहे. वक्फ प्रकरणी ईडी माझ्या घरी येणार असे किरीट सोमय्या यांनी म्हटले. ईडीने किरीट सोमय्या यांना अधिकृत प्रवक्ता केले का, असा सवाल करत तसं असेल तर जाहीर करावे, अशी टीका मलिकांनी यावेळी केली. तसेच ईडीने बोलावल्यास स्वत: त्यांच्या कार्यालयात जाणार आहे, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. ईडीने अधिकृत माहिती द्यावी, मीडियात बातम्या पेरून बदनाम करण्याचे काम बंद करावे, या शब्दांत नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांनी, साथियों, सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है. डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है, गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, असे ट्विट केले होते.