Join us

Nawab Malik : "अकोल्याचा कालीचरण महाराज हा फर्जीबाबा; त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा!"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 2:13 PM

NCP Nawab Malik Slams Kalicharan Maharaj : नवाब मलिक यांनीही कालीचरण महाराजावर हल्लाबोल केला आहे.

मुंबई - छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे दोन दिवसीय धर्म संसद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून धर्माचे अनुयायी आले होते. अकोल्याच्या कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) याने या कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. कालीचरण महाराजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (NCP Nawab Malik) यांनीही कालीचरण महाराजावर हल्लाबोल केला आहे. "अकोल्याचा कालीचरण महाराज हा फर्जीबाबा; त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा!" असं म्हटलं आहे. 

"राष्ट्रपिता महात्मा गांधी हे श्रद्धास्थान आहेत. सत्य आणि अहिंसा ही विचारधारा जगाने स्वीकार केली. फर्जीबाबा अकोल्याचा रहिवासी असून नाव कालीचरण महाराज आहे.  संपूर्ण ट्विटर बघा, सोशल मीडिया बघा, बातम्या बघा या फर्जीबाबाने राष्ट्रपित्याबद्दल अपशब्द काढले... तो कार्यक्रम कुठेही झाला असेल, तो अकोल्याचा रहिवासी आहे. बापूंच्या विचारांना विरोध असू शकतो. विचारांची लढाई विचारांनी होऊ शकते. अपशब्द वापरण्याचा अधिकार नाही. राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा... महात्मा गांधींचा अवमान करत असेल तर तो आम्ही सहन करणार नाही" असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांनी"खरं तर नवाब मलिकांनी माफी मागितली पाहिजे. महात्मा गांधींचा अवमान झालं असताना सरकार हातावर हात ठेवून बसतंय. पोलिसांनी अटक का केली नाही?" असं म्हटलं आहे.

महात्मा गांधींविषयी अपशब्दांचा वापर केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 डिसेंबर रोजी रायपूर येथे झालेल्या धर्म संसदेत कालीचरण महाराज याने आक्षेपार्ह विधान केले होते. पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये, महाराष्ट्रातील अकोला येथून येथे आलेल्या कालीचरण महाराज याने महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या भाषणात समाजातील विविध समुदायांमध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या विधानांचाही समावेश होता. 

टॅग्स :नवाब मलिकमहात्मा गांधी