Join us

राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 9:50 PM

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वात काल झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

MLC Election ( Marathi News ) : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान संपल्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी निवडणूक होत असून या निवडणुकीच्या निमित्ताने महायुती आणि महाविकास आघाडीत अंतर्गत संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. कारण प्रत्येक पक्ष ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून उमेदवारांचीही घोषणा केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज आपल्या पक्षाकडून मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

"शिवाजीराव नलावडे यांनी पक्षाकडे मुंबई शिक्षक मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली होती. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वात काल झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत नलावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं," अशी माहिती आज प्रसारमाध्यमांशी बोलताना तटकरे यांनी दिली आहे. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीला  राज्यातील मोठे राजकीय पक्ष महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामोरे गेले होते. मात्र आता विधानपरिषद निवडणुकीत मात्र बहुतांश पक्षांनी एकला चलो रेचा नारा दिल्याने राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

कोणत्या मतदारसंघांत होणार निवडणूक?

विधान परिषदेच्या मुंबई व कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी पुढे ढकललेला निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम शुक्रवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार चार जागांसाठी येत्या २६ जून रोजी मतदान होणार असून,  मतमोजणी १ जुलै रोजी होणार आहे. विधानपरिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे उद्धवसेनेचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील व नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांची सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०२४  रोजी संपत आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.  

मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष असलेले ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघातून सध्या कपिल पाटील आमदार आहेत. आता भाजपा इथे कोणाला उतरविते याकडे पाहणे गरजेचे आहे. 

असा आहे निवडणूक कार्यक्रम अधिसूचना : ३१ मे २०२४अर्ज भरण्याची अंतिम तारीख : ७ जून अर्जांची छाननी : १० जून २०२४ अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख : १२ जून २०२४ मतदान : २६ जून २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतमोजणी : १ जुलै २०२४ 

टॅग्स :सुनील तटकरेनिवडणूक 2024अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस