“शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांचे आंदोलन, उपोषणाला बसले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 03:34 PM2023-05-02T15:34:34+5:302023-05-02T15:35:43+5:30

NCP Sharad Pawar Retirement: शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन, उपोषण सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

ncp party workers starts protest after sharad pawar announcement of retire from president post | “शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांचे आंदोलन, उपोषणाला बसले

“शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांचे आंदोलन, उपोषणाला बसले

googlenewsNext

NCP Sharad Pawar Retirement: लोक माझे सांगाती या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथा पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते तसेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आले होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना अचानक शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यानंतर एकच गोंधळ उडाला. काही वेळाने शरद पवार निवासस्थानी गेले. यानंतर व्हाय.बी.चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. तसेच काही कार्यकर्ते उपोषणाला बसले.

शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती सर्वच उपस्थित नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी केले. प्रसंगी निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत उपोषणाला बसू, अन्न-पाणी त्यागू, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला. शरद पवार यांचा हा निर्णय समजताच राज्यभरातील कार्यकर्त्यांकडून तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले होते. सर्वच जण शरद पवार यांना आजच निर्णय मागे घ्यावा, असा आग्रह धरत होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपोषणाला बसले असल्याची माहिती आहे. यात अनेक महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांचे आंदोलन, उपोषणाला बसले

कार्यकर्त्यांनी उपोषण आणि आंदोलन सुरू केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ नेते मंडळी, अन्य नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. मात्र, तोपर्यंत तुम्ही शांत राहावे. सकाळपासून कोणीच काही खाल्लेले नाही. खाऊन घ्यावे. शांतपणे भूमिका घ्यावी, असे सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना समजावले. मात्र, कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. यावेळी हमारा नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो.., अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.

दरम्यान, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. धाराशीवचे जिल्हाप्रमुख सुरेश बिराजदार यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपवल्याचे सांगितले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: ncp party workers starts protest after sharad pawar announcement of retire from president post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.